कंत्राटी क्रीडा शिक्षकांना नवीन नियुक्ती देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:36 AM2021-09-24T04:36:40+5:302021-09-24T04:36:40+5:30
निवेदनात, २ ऑगस्टपासून आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या आश्रमशाळा सुरू झाल्या आहेत. या आश्रमशाळांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग सुरू ...
निवेदनात, २ ऑगस्टपासून आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या आश्रमशाळा सुरू झाल्या आहेत. या आश्रमशाळांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. तरीदेखील क्रीडाशिक्षक यांना नियुक्ती आदेश देण्यात आले नाही. राज्यातील काही प्रकल्पांतर्गत कला शिक्षक व संगणक शिक्षक यांना डहाणू व पालघर सारख्या काही प्रकल्पात हजर करून घेण्यात आले आहे.
नियुक्त कंत्राटी क्रीडाशिक्षक हे राज्य व राष्ट्रीय खेळाचे प्रतिनिधित्व केलेले आहेत. पात्रताधारक असूनदेखील त्यांना कामावर हजर करून घेतले गेले नाही. कंत्राटी क्रीडा शिक्षकांची भरती ही जिल्हा निवड समितीकडून झाली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी व प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यातून २०१८ पासून दुर्गम व अतिदुर्गम भागातील आश्रमशाळेवर जाऊन कंत्राटी क्रीडाशिक्षक आदिवासी विद्यार्थी घडविण्याचे कार्य करीत आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शारीरिक व्यायामाचे महत्त्व द्विगुणीत झाले आहे. शाळा बंद असल्यामुळे मागील दोन वर्षांपासून मुलांचे व्यायाम बंद आहेत. मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने शारीरिक व्यायाम करणे आवश्यक आहे. तसेच शारीरिक व्यायाम केल्याने मुलांच्या शरीरातील रोग प्रतिकारशक्तीत वाढ होते. नियुक्ती आदेश नसल्याने क्रीडा मार्गदर्शक/ शिक्षक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे तातडीने नियुक्ती आदेश देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर कंत्राटी क्रीडा शिक्षकांच्या सह्या आहेत.