असलोद परिसरात पाणीटंचाई, रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 01:13 PM2018-10-29T13:13:01+5:302018-10-29T13:13:04+5:30
असलोद : शहादा तालुक्यातील पूर्व भागातील असलोदसह मंदाणे परिसरात यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
असलोद : शहादा तालुक्यातील पूर्व भागातील असलोदसह मंदाणे परिसरात यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याअभावी पिके जेमतेम तग धरून असल्याने उत्पन्नात कमालीची घट येणार आहे. त्यामुळे प्रशासनाने आतापासून प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.
तालुक्यातील पूर्व भागात कापूससह मूग, मका, बाजरी, सोयाबीन व पपईची मोठय़ा प्रमाणात लागवड करण्यात आली होती. परंतु पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा खूपच कमी असल्याने पिकांना पूर्ण क्षमतेने पाणी न मिळाल्याने हंगाम हातातून गेल्यातच जमा आहे. दिवाळीनंतर शेतशिवार रिकामे दिसून येणार असून, विहिरी, नदी-नाल्यांसह धरणांमध्ये पूर्ण क्षमतेचा जलसाठा नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. दुष्काळाने आतापासूनच आपले रौद्ररुप दाखवण्यास सुरूवात केली असून, येणा:या काळात परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. दरवर्षी या भागातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. यंदा तर पुरेशा प्रमाणात पजर्न्यमान न झाल्याने पाणीप्रश्न गंभीर बनणार आहे. काही गावांमध्ये आतापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली असल्याने येणा:या उन्हाळ्यात गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. प्रशासनाने आत्तापासूनच ठोस उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मजुरांचे स्थलांतर
रोजगारासाठी ग्रामीण भागातून मोठय़ा प्रमाणात मजूरवर्ग गुजरात, मध्य प्रदेश व सौराष्ट्रात जात आहेत. परिसरातील दुधखेडा, लोंढरे या धरणात जेमतेम पाणीसाठा असल्याने शेतीला पाणी मिळणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे रोजगारही कमी होणार असल्याने मजुरांनी आतापासून स्थलांतर सुरू केले आहे. यंदाच्या हंगामात भारनियमनाचाही फटका शेतक:यांना सहन करावा लागत आहे. पाण्याअभावी पिकांवर झालेला खर्च निघणेही मुश्कील झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
शासनातर्फे दुष्काळ सदृष्य तालुक्यांमध्ये महसूल व कृषी विभागाकडून शेतशिवारात जावून अधिकारी व कर्मचारी माहिती जाणून घेत आहेत. असलोद येथे तहसीलदार मनोज खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी एस.आर. लहाने, तलाठी सुरेखा राठोड, कृषी पर्यवेक्षक कोळी यांनी शेतात जावून पाहणी केली. या वेळी शेतकरी उपस्थित होते. शासनानेदेखील लवकरात लवकर उपाययोजना करण्याची गरज आहे.