नवापुरात सावकारी करणाऱ्या दोघांच्या घरावर उपनिबंधकाच्या पथकाची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 12:29 PM2021-01-01T12:29:17+5:302021-01-01T12:29:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरातील दोन संशयित सावकाराच्या घरी जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील पथकाने झडती घेतली. झडतीमध्ये मोठे घबाड ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : शहरातील दोन संशयित सावकाराच्या घरी जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील पथकाने झडती घेतली. झडतीमध्ये मोठे घबाड काय हाती लागल्याची माहिती आहे. पथकाकडून उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता. तक्रारीवरून गुरुवारी सकाळपासून चौकशी करण्यात आली होती.
नवापूर शहरातून चार वेगवेगळ्या तक्रारदारांनी संशयित सावकारांविरुद्ध जिल्हा उपनिबंधक कार्यालयात तक्रार दाखल केली होती. जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे देण्यात आलेल्या तक्रारीनुसार एकाने १२ लाख, एकाने ५ लाख, तर एकाने दोन लाख रुपये संशयित सावकारी करणाऱ्याकडून व्याजाने घेतले होते. या रकमेपोटी तिघांकडून १० टक्के व्याज वसूल करण्यात येत होती. पैसे देण्यास विलंब झाल्यास शिवीगाळ व जिवेठार मारण्याची धमकी दिली जात होती. या तक्रारीच्या आधारे गुरुवारी नंदुरबार येथील प्रभारी जिल्हा उपनिबंधक प्रताप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख रणजित पाटील, सहकार अधिकारी रत्ना मोरे, प्रकाश खैरनार, सुनंदा सामुद्रे, संगीता कोळी, कुंती पाडवी, हेमंत मरसाळे, शासकीय पंच सखाराम चौधरी, रुस्तम वसावे, किशोर पटेल यांनी नवापूर येथील संशयितांच्या घरी झडती सुरू केली. यादरम्यान संशयितांच्या घरातून एक कट्टा, रोख रक्कम, महत्त्वाचे दस्तावेज जमा करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पंचनाम करण्याची प्रक्रिया सुरू होती. पंचनाम्यानंतर नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या प्रकरणाची दिवसभर नवापूर शहरात चर्चा रंगली होती. शहरात एका आठवड्यात दोनवेळा तीन ठिकाणी घराची झाडाझडीत घेण्यात आल्याने अवैध सावकारी करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे. शहरात कोट्यवधी रुपयांच्या रक्कम सावकारीतून वाटप करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
नवापुरात चार जणांकडे परवाने
नवापूर शहरात केवळ चार जणांकडे सावकारीचे परवाने आहेत. त्यापैकी तिघांनी परवाने नूतनीकरण केले आहे. एकाचा परवाना नूतनीकरण करण्याचे काम शिल्लक असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान. नंदुरबार जिल्ह्यात कोणी सावकार शेतकरी किंवा नागरिकांना कर्ज दिले असेल व कर्जाचा रकमेपेक्षा जास्त रकमेची मागणी करत असेल तर अशा सावकारांविरुद्ध नंदुरबार जिल्हा उपनिबंधक कार्यालयात तक्रार दाखल करण्याचे आवाहन प्रभारी जिल्हा उपनिबंधक प्रताप पाडवी यांनी केले आहे.