आगीत रेशन दुकान, गायीचा गोठ्यासह संसारोपयोगी वस्तू खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 11:55 AM2020-11-25T11:55:09+5:302020-11-25T11:55:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : येथून तीन किलोमीटर अंतरावरील कुंभारपाडा येथे एका दुमजली कौलारू लाकडी घरास लागलेल्या आगीत गुरांचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : येथून तीन किलोमीटर अंतरावरील कुंभारपाडा येथे एका दुमजली कौलारू लाकडी घरास लागलेल्या आगीत गुरांचा गोठा व सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानातील सर्व कागदपत्रे जळून राख झाली. सुदैवाने यावेळी कुठलीही जीवित हानी झाली नाही. नवापूर येथून अग्निशमन बंब मागण्यात आला. घरातील पुरुष वर्ग शेतात गेले असताना केवळ महिलांनी आग विझवण्यासाठी केलेले प्रयत्न येथे लक्षवेधी ठरले आहे.
तालुक्यातील कुंभारपाडा येथे नवापूर पंचायत समितीचे माजी सभापती तसेच धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक रतिलाल होण्या गावित यांचे दुमजली कौलारू लाकडी घर आहे. या घराच्या वरच्या मजल्यावर गुरांसाठी चारा साठवून ठेवलेला होता. तर खालच्या बाजूला गुरांचा गोठा आहे. गोठ्याच्या बाजूला सरकारमान्य स्वस्त धान्य दुकान चालविले जाते.
मंगळवार २४ रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास या घराच्या वरच्या मजल्या अचानक आग लागली. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. या आगीत वरच्या मजल्यावरील गुरांसाठी ठेवलेला चारा व वरचा मजला पूर्णपणे जळून राख झाला तसेच गुरांच्या गोठा देखील जळून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले . गुरांच्या गोठ्यात गाई बांधल्या होत्या मात्र ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत या गायी त्वरित सोडल्या. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. त्याचप्रमाणे गुरांच्या गोठ्याच्या बाजूला सरकारमान्य स्वस्त धान्य दुकान चालविले जाते. या महिन्याचे धान्य लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले होते. त्यामुळे शासकीय धान्याचे नुकसान झालेले नसले तरी स्वस्त धान्य दुकानात ठेवलेले सर्व शासकीय कागदपत्र व दप्तर मात्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने सर्व जळून राख झाले. घराच्या मागच्या बाजूस साठवून ठेवलेले स्वतःचे धान्य - साळ(भात) देखील आगीत नुकसान झाले. तर काही प्रमाणात वाचण्यात आले.
घरास आग लागली तेव्हा घर मालक रतिलाल गावित व त्यांचा मुलगा इंद्रजीत गावित हे सकाळीच शेतात निघून गेले होते. घरात कोणीच पुरुषवर्ग नसताना महिलांनी आग विझवण्यासाठी स्वतःच्या कूपनलिकेच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी नवापाडा, बोदवड व कुंभारपाडा येथील ग्रामस्थ आग विझवण्यासाठी मदतीला धावून आले. नवापूर येथून अग्निशमन बंब मागवीण्यात आला. तोपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले होते.
विसरवाडीचे पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाने पोलीस कॉन्स्टेबल अतुल पाटील व कर्मचारी तसेच तलाठी नरेंद्र महाले पोलीस पाटील सोमुवेल गावित आदी घटनास्थळी उपस्थित होते.