दुष्काळी स्थितीतही चेतक फेस्टीवलची धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 07:07 PM2018-12-24T19:07:19+5:302018-12-24T19:07:24+5:30

घोडेबाजारात चैतन्य : पाच वर्षातील उलाढालीचा विक्रम गाठणार

Dhakat at Chetak Festival in drought condition | दुष्काळी स्थितीतही चेतक फेस्टीवलची धूम

दुष्काळी स्थितीतही चेतक फेस्टीवलची धूम

Next

रमाकांत पाटील । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असले तरी याही स्थितीत सारंगखेडा, ता.शहादा येथील चेतक फेस्टीवलमधील घोडाबाजारातील चैतन्य कायम आहे. अवघ्या आठ दिवसात या बाजारात दीड कोटीहून अधिक उलाढाल झाली असून यंदा घोडे विक्रीतील उच्चांक गाठण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, आतार्पयत पाच लाख 71 हजार रुपये सर्वाधिक किमतीचा घोडय़ाची विक्री झाली असून एक कोटी 11 लाख  रुपये किमतीचा ‘सुलतान’ घोडा या बाजारात लक्षवेधी ठरला आहे.
सारंगखेडा येथील एकमुखी दत्ताची यात्रा संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. या यात्रेनिमित्ताने भरणारा घोडेबाजार हा देशातील अग्रक्रमांकाचा बाजार मानला जातो. त्याला आता महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने चेतक फेस्टीवल सुरू करून या बाजाराचे अधिक महत्त्व वाढवले आहे. त्यानिमित्ताने घोडय़ांच्या नृत्यस्पर्धा, शर्यती यासह विविध स्पर्धा रोज येथे होत असल्याने देशभरातील अश्वप्रेमींचा एकप्रकारे कुंभमेळाच भरला आहे. गेल्या आठ दिवसापासून येथे विविध स्पर्धाची धूम सुरू आहे. त्यानिमित्ताने घोडेबाजारातही चैतन्य आले आहे.
यावर्षी या बाजारात एकूण दोन हजार 200 घोडे विक्रीसाठी आले आहेत. त्यापैकी गेल्या आठ दिवसात 529 घोडय़ांची विक्री झाली असून त्यातून एक कोटी 55 लाख 98 हजार 800 रुपयांची उलाढाल झाली आहे. आतार्पयत सर्वाधिक पाच लाख 71 हजार रुपये किमतीचा मारवाड घोडा विक्री झाला आहे. याशिवाय गेल्या दोन दिवसात सर्वाधिक किमतीचे पाच लाख 51 हजार व पाच लाख 11 हजार रुपये किमतीचे घोडेही येथे विकले गेले. बाजारात पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, मध्य प्रदेशासह महाराष्ट्रातीलही घोडे विक्रीला आले आहेत. त्यातील बहुतांश घोडे नावानेच चर्चेत असून अश्वप्रेमींसाठी ती एक पर्वणी ठरली आहे. उत्तर प्रदेशातील ‘सुलतान’ हा घोडा अधिक लक्षवेधी आहे. त्याची किंमत एक कोटी 11 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. याशिवाय 50 लाख व त्यापेक्षा अधिक किमतीचे घोडेही येथे विक्रीला आहेत.
काही अश्वशौकीन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले घोडे येथे आणत आहेत. असे जवळपास 400 उमदे घोडे येथे आले असून त्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. आग्रा येथून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खास ‘शान’ हा घोडा येत आहे. त्याची किंमत पाच कोटी रुपये आहे. मात्र तो विक्रीसाठी नसून केवळ स्पर्धेसाठी येत आहे.
या बाजारात आतार्पयत जे घोडे खरेदी झाले त्यातील बहुतांश खरेदीदार हे महाराष्ट्रातीलच आहेत.  हा बाजार 12 जानेवारीर्पयत सुरू राहणार आहे. गेल्यावर्षी याठिकाणी तीन कोटी 27 लाख रुपयांची तर 2016 मध्ये दोन कोटी 77 लाख रुपयांची उलाढाल झाली होती. यावर्षी आताच दीड कोटीचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे यंदा साडेतीन कोटीपेक्षा अधिक उलाढाल होण्याची शक्यता असून यंदा घोडे विक्रीचा विक्रम गाठण्याचा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत.

Web Title: Dhakat at Chetak Festival in drought condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.