शहाद्यातील सहा पुरातन हनुमान मंदिरांची वेगवेगळी वैशिष्टे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:04 PM2018-03-31T12:04:35+5:302018-03-31T12:04:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : पवनपूत्र श्रीरामभक्त हनुमानाची शहाद्यात तब्बल सहा पुरातन व जागृत देवस्थाने आहेत. या सर्व मंदिरांवर दरवर्षी मोठय़ा उत्साहात हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. हनुमान जन्मोत्सवानिमित्त ही सर्व मंदिरे सजविली जातात. दिवसभर विविध कार्यक्रमांनी सर्व मंदिरांचा परिसर दुमदुमुन जातो.
शहरातील खोल गल्लीतील पुरातन हनुमान मंदिर सुमारे 135 वर्षापूर्वीचे आहे. शहादा शहराचे ग्रामदैवत म्हणून या मंदिराचा मान आहे. मनोकामना पूर्ण करणारी देवता म्हणून ख्याती असलेले हे देवस्थान हनुमान भक्तांचे श्रद्धांस्थान आहे. बैल पोळ्याला या मंदिरावर सजविलेल्या बैलांना मिरवणुकीने आणून पूजन करण्याची जुनी परंपरा आहे. पूर्वी मोठय़ा संख्येने बैल पोळ्याला येथे बैल आणली जात आताही संख्या खूप कमी झाली असून, ही परंपरा कालबाह्य होत आहे.
कुकडेल उतरतीवर हनुमानाचे दुसरे एक मंदिर असून, या मंदिराला कुकडेलचे ग्रामदैवत म्हटले जाते. हे मंदिरदेखील पुरातन असून, या मंदिराच्या देखरेखीसाठी मंदिर ट्रस्ट आहे. मंदिराच्या मालकीची शेत जमीनही आहे. मात्र तरीही हे मंदिर दुर्लक्षित असल्याने मंदिराची अवस्था ‘जैसे थे’ आहे. रामेश्वर मंदिराजवळ अलीकडेच एक छोटेसे हनुमान मंदिर तयार झाले असून, येथे छोटीशी हनुमानाची सुंदर मूर्ती आहे.
शहादा-दोंडाईचा रस्त्यालगत सुमारे दडीशे वर्षापूर्वीचे प्रेस मारोती मंदिर आहे. पूर्वीचे छोटेसे पुरातन मंदिर व मूर्ती जैसे ठेवून काही वर्षापूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. दरवर्षी दस:याला शहादेकर येथे सिमोल्लंघनासाठी येतात. पुरातन हनुमान मंदिर असल्याने असंख्य हनुमान भक्तांचे हे श्रद्धास्थान आहे.
याशिवाय बसस्थानकासमोरही अलिकडेच निर्माण झालेले श्री महावीर बजरंगबली मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान झाले आहे. पूर्वी येथे छोटेसे पुरातन हनुमान मंदिर होते. मात्र मंदिर परिसरात खूप अतिक्रमण झाल्याने हे मंदिर अनेकांना माहित नव्हते. गेल्या वर्षीच काही हनुमान भक्तांनी येथे सुंदर आणि भव्य मंदिर उभे केल्याने शहरातील ते एक आकर्षण केंद्र झाले आहे.
उंटावद येथे गोमाई-सुसरीच्या संगमावर श्री रोकडमल हनुमानांचे सुंदर आणि भव्य मंदिर आहे. उंटावदची ग्रामदेवता म्हणून मान्यता पावलेले हे मंदिर पुरातन असून, तालुक्यातील सा:याच हनुमान भक्तांचे श्रद्धास्थान आहे.
मंदिराचा परिसर भव्य असून, दर शनिवारी येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. याशिवाय तालुक्यात इतर ठिकाणीही हनुमान मंदिरे असून, हनुमान जयंतीनिमित्त ही सर्व मंदिरे विद्युत रोषणाईने सजविण्यात आली आहेत. शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त या सर्व मंदिरांवर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.