डामरखेडा येथून डिजिटल क्लासरूमचे साहित्य तर गव्हाळीच्या जनावरांच्या दवाखान्यातून बॅटरी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:34 AM2021-09-12T04:34:48+5:302021-09-12T04:34:48+5:30
नंदुरबार : डामरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेतून चोरट्यांनी १९ हजार रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य तर गव्हाळी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातून ११ ...
नंदुरबार : डामरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेतून चोरट्यांनी १९ हजार रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य तर गव्हाळी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातून ११ हजारांचे साहित्य चोरून नेल्याची घटना १० सप्टेंबर रोजी रात्री घडली. याप्रकरणी शहादा व अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी जिल्हा परिषद शाळांमधून चोरीचे सत्र कायम ठेवले आहे. आता पुन्हा डामरेखेडा (ता. शहादा) येथील जिल्हा परिषद शाळेतून डिजिटल क्लासरूममधील साहित्य चोरट्यांनी चोरून नेले. शाळेच्या डिजिटल क्लासरूमचे कुलूप तोडूच चोरट्यांनी इन्व्हर्टर व बॅटरी, वेब कॅमेरा व इलेक्ट्रिक सेन्सर असा एकूण १९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. सकाळी शिक्षक शाळेत आल्यावर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. याबाबत विश्वास राजाराम माळी (रा. नंदुरबार) यांनी फिर्याद दिल्याने शहादा पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार रामा वळवी करत आहेत.
दुसरी घटना गव्हाळी (ता. अक्कलकुवा) येथे घडली. गव्हाळी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात चोरट्यांनी चोरी केली. दवाखान्याच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. यावेळी सोलर पाॅवरच्या दोन बॅटरी व एक इन्व्हर्टर असे ११ हजारांचे साहित्य लंपास केले. याबाबत वाल्मीक सोपान होंडे यांनी फिर्याद दिल्याने अक्कलकुवा पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार शिरसाठ करत आहेत.