डिजीटल इंडियात गांधींचे आता चौथे माकड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 11:11 AM2017-10-08T11:11:19+5:302017-10-08T11:11:19+5:30
बुरा मत शेअर करो : तीन माकडांमध्ये मोबाईलधारीची भर
रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ‘बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत कहो’ असे संकेत देणारे गांधींची तीन माकडे सर्वश्रुत आहेत. मात्र सध्या डिजीटल इंडियामुळे सोशल मिडीयाचा वापर वाढल्याने त्यात आता ‘बुरा मत शेअर करो’ असा संकेत देणा:या चौथ्या माकडाचीही भर पडली आहे. नुकतीच गांधी जयंती देशभरात उत्साहात साजरी झाली. त्यातूनच ही नवी कल्पना आता उदयास येत आहे.
1933 साली महात्मा गांधींच्या सत्याग्रह आश्रमात जपानचे गुरुजी फ्यूजी हे आले होते. त्यांनीच त्यावेळी गांधीजींना तीन माकडांची प्रतिकृती भेट दिली होती. ही तीन माकडे पुढे गांधीजींच्या नित्याच्या प्रार्थनेत समाविष्ट झाली आणि त्याचा बोध समाजापुढे मांडला गेला. डोळ्यावर पट्टी बांधलेले माकड म्हणजे समाजातील वाईट पाहू नका, कानावर हात ठेवलेले माकड म्हणजे समाजातील वाईट गोष्टी ऐकू नका आणि तोंडावर हात ठेवलेले माकड म्हणजे कोणाला वाईट बोलू नका. ही तीन माकडे त्याकाळी खूप प्रसिद्ध झाली. देशाच्या स्वातंत्र्यानंतरही या तीन माकडांच्या प्रतिकृती अनेक ठिकाणी समाजाला बोध देण्यासाठी वापरली जात आहेत. काही शहरांमध्ये त्याचे चौकात स्टेच्यूही लावले आहेत. नंदुरबार शहरातही पालिकेने महात्मा गांधींच्या अर्धकृती पुतळ्याजवळ या तीन माकडांचे पुतळे लावले आहेत.
गांधींनी जो संदेश या माकडांच्या माध्यमातून दिला त्याचा उलट संदेश मध्यंतरी शासनाच्या लाचप्रतिबंधक विभागाने दिला होता. त्यात जे वाईट पाहिले ते बोला, ते ऐका आणि उघडय़ा डोळ्याने पाहून लाच प्रतिबंधक विभागाला कळवा, असा त्याचा आशय होता. त्यासाठी त्यांनी गांधींच्या या तीन माकडांचा वापर केला होता.
आता सध्या डिजीटल युग आल्याने मोबाईलचा वापर मोठय़ा प्रमाणावर सुरू झाला आहे. हा अतिरेक प्रशासन आणि समाजालाही डोकेदुखी ठरत आहे. अनेक जण सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्हॉटस्अप, फेसबुक, टि¦टर, इन्स्टाग्रामद्वारे वाईट मेसेसेज किंवा चित्र पाठवून सामाजिक शांतता बिघडवत आहेत. त्यातून अनेक गुन्हेही घडत आहेत. अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. मुलांच्या आत्महत्या होत आहेत, अशा किती तरी घटना रोज केवळ सोशल मिडीयातील वाईट शेअरींगमुळे होत आहेत. हे टाळण्यासाठी व समाजाला त्या माध्यमातून बोध देण्यासाठी आता ‘मोबाईलवर वाईट शेअर करू नका’ असे सांगणा:या चौथ्या माकडाची जोड देण्यात आली आहे. गांधी जयंतीच्या दिवशी सोशल मिडीयावर ही पोस्ट मोठय़ा प्रमाणावर व्हायरल झाली. त्यामुळे अनेकांना ती संकल्पना पटलीही. समाज व प्रशासनाला जागृतीसाठी हे माकड निश्चितच उपयोगी पडणार असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे गांधींचे ‘मोबाईलवर वाईट शेअर करू नका’ असे दर्शविणारे चौथे माकड सध्या चांगल्याच चर्चेत आले आहे.