कापसाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:32 AM2021-09-26T04:32:49+5:302021-09-26T04:32:49+5:30
शहादा तालुक्यातील सारंगखेडा परिसरात कापूस काढणीला सुरुवात झाली आहे. आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी घरात आलेला कापूस लगेच विक्री करीत ...
शहादा तालुक्यातील सारंगखेडा परिसरात कापूस काढणीला सुरुवात झाली आहे. आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी घरात आलेला कापूस लगेच विक्री करीत आहे. अनेक व्यापारी खेडा खरेदी करीत असून या खरेदीतून शेतकऱ्यांची सर्रास लूट होत असल्याचे चित्र दिसत आहे. साडेतीन ते चार हजार रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस खरेदी करीत आहेत. आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना कापूस विक्रीशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही. त्याचाच फायदा कापूस व्यापारी घेत आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची प्रतिक्रिया उमटत आहेत.
मध्य प्रदेश राज्यातील खेतिया येथे पाच हजार, सहा हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल दराने कापसाची खरेदी होत आहे. मात्र, स्थानिक ठिकाणी येणारे व्यापारी ओला कापूस असल्याचे कारण दाखवत कोरड्या कापसालाही मनमानी भावाने खरेदी करीत आहेत. काही भागात अतिपावसामुळे कापसाचे पूर्णत: नुकसान झाले असून एकरी तीन ते चार क्विंटल उत्पादन येण्याची शक्यता आहे. असे असताना महागडी खते, बियाणे व कीटकनाशकांचा खर्चदेखील शेतकऱ्यांचा निघेनासा झाला आहे. यंदा आधीच उशिरा पाऊस, त्यात दीड महिने पावसाने मारलेली दडी आणि त्यानंतर झालेला जास्त पाऊस या तिहेरी संकटांना यावर्षी शेतकरी सामोरा गेला. त्यात अनेक शेतकऱ्यांचे कापसाचे मोठे नुकसान झाले. उत्पादनात प्रचंड घट असताना अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
सोयाबीनही दहा हजारांवरून पाच हजारांवर
जिल्हाभरात सोयाबीन या पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणावर झाला आहे. मात्र, शेतकऱ्यांचे सोयाबीन घरात आले नाही तोवर सोयाबीनच्या दरात प्रचंड घसरण पाहावयास मिळत आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी सोयाबीनला सुरुवातीला नऊ हजार ते दहा हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. परंतु, सद्य:स्थिती पाहता सोयाबीनचे दर पाच हजारांवर आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
कापसावर लाल्या व मर रोगांचा प्रादुर्भाव
सारंगखेडासह परिसरात कापूस पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. सखल भागातील कापसावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीतून सावरणे शेतकऱ्यांना कठीण जात आहे. शासनाने या सर्व परिस्थितीची त्वरित दखल घेत शेतकऱ्यांना हेक्टरी अपेक्षित मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.