जिल्हा परिषदेतच पाण्यासाठी वणवण

By admin | Published: March 2, 2017 11:08 PM2017-03-02T23:08:45+5:302017-03-02T23:08:45+5:30

नंदुरबार : संपूर्ण जिल्हाभरातील पाण्याच्या टंचाईवर उपाययोजना करणाºया जिल्हा परिषदेचाच घसा कोरडा पडल्याचे चित्र आहे.

Distribution to water only at Zilla Parishad | जिल्हा परिषदेतच पाण्यासाठी वणवण

जिल्हा परिषदेतच पाण्यासाठी वणवण

Next

नंदुरबार : संपूर्ण जिल्हाभरातील पाण्याच्या टंचाईवर उपाययोजना करणाºया जिल्हा परिषदेचाच घसा कोरडा पडल्याचे चित्र आहे. इमारत आवारात पिण्याचे पाणी नसल्यामुळे जवळपास सर्वच विभागांना पाण्याचे जार लावावे लागले आहेत. विशेष म्हणजे कामे घेऊन येणाºया नागरिकांना तर पाण्यासाठी भटकंती करावी लागते.  तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्षांनी देऊनही उपयोग झाला नसल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषदेच्या इमारतीत सर्वच सेवा अत्याधुनिक स्वरूपाच्या आहेत. यापूर्वीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषदेचा खर्च कमी करण्यासाठी वायफायदेखील सुरू केले. पेपरलेस कारभाराबाबत जिल्हा परिषद आघाडीवर आहे. असे असताना इमारतीत पिण्याच्या पाण्याची सुविधा गेल्या अनेक वर्षांपासून होऊ शकत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात कर्मचाºयांना आणि कामे घेऊन येणाºया नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते.
कूपनलिका व विहीर
जिल्हा परिषदेची पाण्याची गरज पुरविण्यासाठी आवारात कूपनलिका व विहीर आहे. परंतु उन्हाळ्यात त्यांच्या पाण्याची पातळी खोल जाते. इमारत असलेला परिसर हा खडकाळ भागाचा व खदाणीचा आहे. त्यामुळे या भागात हजार फुटापर्यंतदेखील पुरेसे पाणी लागत नसल्याची स्थिती आहे. या दोन कूपनलिकांद्वारे परिसरात आणि कर्मचारी वसाहतींमध्ये पाणी पुरविण्यात येते. सध्या दोन्ही कूपनलिकांची पाणी पातळी खोल गेलेली आहे.
पिण्यालायक नाही
येथे असलेल्या कूपनलिकांचे पाणी पिण्यालायक नसल्याचा अहवाल यापूर्वीच देण्यात आला आहे. त्यामुळे हे पाणी कर्मचारी पित नाहीत. परिणामी कुणी घरून पाणी आणतो, तर काही विभागांनी विकत पाण्याचे जार लावले आहेत.
आर.ओ. वॉटर फिल्टर पदाधिकाºयांच्या आणि दोन अधिकाºयांच्या दालनात लावण्यात आलेले आहेत. परंतु त्या ठिकाणी इतर कुणालाही पाणी घेऊ दिले जात नसल्याची स्थिती आहे.
आर.ओ. सिस्टिम खराब
या ठिकाणी असलेली आर.ओ. सिस्टिम गेल्या अनेक दिवसांपासून खराब झाली आहे. कूपनलिका, विहीर आणि पालिकेतर्फे घेण्यात आलेल्या कनेक्शनमधून पाणी इमारतीच्या वर असलेल्या टाकीमध्ये जाते. तेथून निघणारे पाणी आर.ओ.सिस्टिमद्वारे दुसºया टाकीत गेल्यानंतर ते इमारतीत इतरत्र पुरविण्यात येते. परंतु ही यंत्रणाच ठप्प पडली आहे.
अभ्यागतांनाही त्रास
जिल्हा परिषदेत विविध कामे घेऊन येणाºया अभ्यागतांनादेखील पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागते. कुणाकडे पाणी मागितल्यास सरळ नकार दिला जातो. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या एका सार्वजनिक नळावर अभ्यागतांना तहान भागवावी लागते.
या सर्व परिस्थितीमुळे परिसरातील हॉटेल आणि टपरीवर पाण्याच्या बाटल्यांची विक्री वाढली आहे. परिणामी अवाच्या सवा     भावात त्यांची विक्री करण्यात येत आहे.
पालिकेकडून जोडणी
पालिकेची शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन याच परिसरातून गेली आहे. पालिकेकडे यापूर्वी पाणी मागणीसाठी जिल्हा परिषदेने अर्ज केला होता. त्यानुसार मीटर पद्धतीने पाणी देण्यात आले आहे.
कर्मचारी वसाहतीतही समस्या
जिल्हा परिषद इमारतीला लागूनच असलेल्या कर्मचारी वसाहतीतदेखील पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. या वसाहतीतदेखील अनेक कर्मचारी पिण्याच्या पाण्यासाठी जार विकत घेत आहेत. आता उन्हाळ्याच्या दोन ते तीन महिन्यात मोठ्या प्रमाणावर समस्या भेडसावणार आहेत.
त्यामुळे पालिकेने आतापासूनच उपाययोजना करून दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

अध्यक्षांनीच घेतली स्वत: दखल
जिल्हा परिषद इमारतीमधील पिण्याच्या पाण्याच्या समस्येबाबत नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभेतदेखील स्वत: अध्यक्षा रजनी नाईक यांनी संबंधित अधिकाºयांना विचारणा केली होती. काही लोकांनी आणि कर्मचाºयांनी थेट अध्यक्षांकडेच याबाबत ग्राºहाणे मांडले होते. त्यामुळे या प्रश्नाचे गांभीर्य वाढले. त्यावर उपाययोजना होणे आवश्यक असताना ती झालेली नसल्याचे दिसून येते. वास्तविक गेल्या वर्षी अभ्यागतांसाठी इमारतीच्या मधल्या आवारात आर.ओ. बसविण्याचा ठराव करण्यात आला होता. परंतु ते बसविले गेले नाही. याउलट सर्वच पदाधिकाºयांच्या दालनात ते बसविण्यात आले.

Web Title: Distribution to water only at Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.