तळोद्यात जिल्हास्तरीय शैक्षणिक परिसंवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 12:27 PM2019-12-09T12:27:13+5:302019-12-09T12:27:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने रविवारी तळोदा येथील आदिवासी संस्कृतिक भवनात जिल्हास्तरीय शैक्षणिक परिसंवाद ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने रविवारी तळोदा येथील आदिवासी संस्कृतिक भवनात जिल्हास्तरीय शैक्षणिक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. ‘शिक्षण वाचवा जनआंदोलन’ व नवीन येणारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर परिसंवादात चर्चा करण्यात आली.
परिसंवादाचे उद्घाटन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख वक्ते म्हणून भारतीय शिक्षण मंडळ देवगिरी प्रांत सहकार्यवाह प्रा.डॉ.उमेश शिंदे व गौरीशंकर घुमाळ तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष अजय परदेशी, नगरसेवक हेमलाल मगरे, प्राथमिक शिक्षक परिषदेचे राज्य सहकार्यवाह पुरुषोत्तम काळे, राजेंद्र चौधरी, जळगाव जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील, धुळे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नांद्रे, संघटनमंत्री दिवाकर सरोदे, महिला जिल्हा कार्यवाह मीनल लोखंडे, प्रदीप शेंडे आदी उपस्थित होते. या वेळी आमदार राजेश पाडवी यांनी आमदार झाल्यानंतर जिल्हा परिषद शाळांना भेटी दिल्यानंतरचे सकारात्मक अनुभव सांगितले. सोबतच तालुक्यासह जिल्ह्यातील व शिक्षक परिषदेच्या विविध समस्या सोडविण्यासाठी विधानसभेत शिक्षकांचा आवाज बनून समस्या मांडेन, असे आश्वासन दिले. नगराध्यक्ष अजय परदेशी यांनीही मनोगत व्यक्त केले.
परिसंवाद मत मांडताना प्रा.डॉ.उमेश शिंदे यांनी नवीन शैक्षणिक धोरणाविषयी मत व्यक्त केले व धोरणात समाविष्ट असणाऱ्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले. प्रा.घुमाळ यांनी ‘शिक्षण वाचवा जनआंदोलन’ या विषयावर परिसंवादात मत मांडताना शिक्षकांची सामाजिक सद्यस्थिती, शैक्षणिक क्षेत्रातील सद्यस्थिती, बदलणारे अभ्यासक्रम व त्याचा शिक्षण क्षेत्रात होणारा परिणाम याबाबत मार्गदर्शन केले.
परिसंवादासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, जिल्हा कार्यवाह प्रकाश बोरसे, जिल्हा सहकार्यवाह दिनेश मोरे, देवेंद्र बोरसे, अक्कलकुवा तालुकाध्यक्ष दीपक सोनवणे, तळोदा तालुकाध्यक्ष मधुकर नागरे, शहादा तालुकाध्यक्ष संजय साळी, नवापूर तालुकाध्यक्ष रामू कोकणी, नंदुरबारचे किरण घरटे, धडगावचे भिका पावरा, मनोज चौधरी, रामकृष्ण बागल, आदींसह शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन राकेश आव्हाड यांनी केले.
या जिल्हास्तरीय शैक्षणिक परिसंवादाला माध्यमिक शिक्षणाधिकारी व सर्व गटशिक्षणाधिकाºयांना तसेच तळोदा गटविकास अधिकारी यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. परंतु या परिसंवादाला सर्व शासकीय प्रमुख पाहुण्यांनी दांडी मारली. यामुळे परिसंवादासाठी उपस्थित जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली.