जिल्ह्याला जास्तीत जास्त रेमडीसीवर मिळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 12:14 PM2020-09-27T12:14:07+5:302020-09-27T12:14:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात आदिवासी विकास विभागातर्फे रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शासनाकडून जास्तीत जास्त रेमडीसीवर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात आदिवासी विकास विभागातर्फे रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शासनाकडून जास्तीत जास्त रेमडीसीवर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावीत अशी अपेक्षा पालकमंत्री अॅड.के.सी.पाडवी यांनी मुख्यमंत्र्यांसोबत आयोजित व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये व्यक्त केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री व अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. पालकमंत्री अॅड. के.सी.पाडवी , जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, तहसीलदार उल्हास देवरे आदी उपस्थित होते. नंदुरबार जिल्ह्यातील काही भाग डोंगराळ आणि दुर्गम असतानादेखील येणाºया अडचणींवर मात करून मोहिम यशस्वी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा चांगले प्रयत्न करते आहे, असे पालकमंत्री अॅड.के.सी.पाडवी यांनी सांगितले. ते म्हणाले, जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून त्यामुळे कोरोना साखळी खंडीत करण्यास मदत होत आहे. बाधित व्यक्तींचा चांगल्या आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न असून जिल्ह्यात लवकरच आॅक्सिजन प्लँटचे काम सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात जागृती करण्याचे प्रयत्न करण्यात येत असून त्यासाठी स्थानिक भाषेचादेखील उपयोग प्रभावी ठरला आहे. रुग्णांच्या वाहतूकीसाठी रुग्णवाहिकांची संख्या वाढविण्यात येत आहे. आदिवासी विभागामार्फतदेखील रुग्णवाहिका घेण्यात येणार असून शासनानेदेखील त्यासाठी व रेमडीसीवर उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी डॉ.भारुड म्हणाले, जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख १९ हजार व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे, तर एक लाख १६ हजार घरांना भेटी देण्यात आल्या आहेत. काही ग्रामपंचायतींनी आरोग्य सुविधेसाठी वाहनांची व्यवस्था केली आहे. जिल्ह्यात ९५ टक्केपेक्षा जास्त चाचण्या आरटीपीसीआर लॅबच्या माध्यमातून होत आहे. आठ खाजगी ठिकाणी कोरोना उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून जिल्हा रुग्णालयात २०० बेड्सची व्यवस्था आहे, अशी माहिती त्यांनी दिली.