जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९९ टक्के; निकाला मुलींची १०० टक्के आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:24 AM2021-07-17T04:24:33+5:302021-07-17T04:24:33+5:30
नंदुरबार : राज्य उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय मंडळाकडून शुक्रवारी दहावीच्या वर्गाचा निकाल जाहीर झाला. ...
नंदुरबार : राज्य उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय मंडळाकडून शुक्रवारी दहावीच्या वर्गाचा निकाल जाहीर झाला. यात नंदुरबार जिल्ह्याने नाशिक विभागातून प्रथम येण्याचा मान पटकावला असून जिल्ह्याचा निकाल हा ९९.९९ टक्के लागला आहे. परंतु जाहीर झालेला निकाल दुपारपर्यंत ऑनलाइन दिसतच नसल्याने विद्यार्थी आणि पालक यांच्या आनंदावर विरजण पडले होते.
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा न घेत मूल्यमापन पद्धतीने विद्यार्थ्यांचा निकाल घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यातील २१ हजार ७५ विद्यार्थ्यांच्या नववीच्या वर्गातील गुणांची मापन करत सराव परीक्षा, चाचण्या तसेच प्रात्यक्षिक परीक्षा यांची माहिती बोर्डाकडे पाठवण्यात आली होती. यानुसार शुक्रवारी निकाल जाहीर करण्यात आला. यात जिल्ह्याने धुळे व जळगावला मागे टाकत विभागातून प्रथम येण्याचा मान मिळवला होता. जिल्ह्यातील ३६२ शाळांमधील विद्यार्थ्यांचा हा निकाल असून गेल्या चार वर्षातील सर्वोच्च निकाल असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. बोर्डाने ऑनलाइन आकडेवारी जाहीर केल्यानंतर येत्या काही दिवसात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निकाल हाती देण्यात येणार आहे.
मुलींची बाजी
यंदाच्या निकालात मुलींनी १०० टक्केे यश मिळवले आहे. परीक्षेत ९ हजार ७४८ विद्यार्थिनी प्रविष्ट झाल्या होत्या. या सर्व विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत.
तर दुसरीकडे प्रविष्ट असलेल्या ११ हजार ३२७ पैकी ११ हजार ३२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नोंदणी केलेले केवळ दोन विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत.
दुपारी निकाल जाहीर करणाऱ्या बोर्डाकडून देण्यात आलेल्या संकेतस्थळांवर एकाचवेळी असंख्य हिट्स मिळत असल्याने वेबसाईट क्रॅश झाली. यातून सायंकाळपर्यंत अनेकांना निकालच पाहता आला नव्हता. मोबाइल ॲपमध्ये क्रमांक टाकल्यानंतरही बराचवेळ निकाल येत नसल्याने अनेकांनी प्रयत्न करणे सोडून दिले होते.
ग्रामीण भागात निकालाची सर्वाधिक उत्सुकता होती. परंतु विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासच मिळत नसल्याने त्यांचा हिरमोड झाला होता.
यंदाच्या निकालात जिल्ह्याची बऱ्यापैकी प्रगती झाली आहे. यात यंदा विशेष प्रावीण्यासह ६ हजार ३२९, प्रथम श्रेणीत १३ हजार १२१, द्वितीय श्रेणीत ९ हजार ५८२ तर पास श्रेणीत यंदा केवळ २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळांकडून दुसरी लाट येण्यापूर्वी घेण्यात आलेले सराव पेपर व चाचण्यांच्या आधारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले होते. यानुसार शाळांनी बोर्डाकडे माहिती दिली होती. शिक्षक शाळा बंद असताना ऑनलाइन माध्यमातून वर्ग घेत होते.
जिल्ह्यात २०१७ या वर्षात जिल्ह्याचा निकाल हा ८६.३८ टक्केे लागला होता. २०१८ या वर्षात जिल्ह्याचा निकाल हा ८० टक्के होता. २०१९ या वर्षात निकालाची टक्केवारी ०खालावून ७७ टक्के झाली होती.
२०२० या वर्षात कोरोनाने शिरकाव केल्याने परीक्षा आटोपत्या घ्याव्या लागल्या होत्या. यातून १८ हजार ३७८ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ८८.१४ टक्के होता.