प्रभागनिहाय मतदान केंद्र निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 11:54 AM2017-10-30T11:54:13+5:302017-10-30T11:54:13+5:30
पालिका निवडणूक : नंदुरबारात 126, नवापूरात 38 तर तळोद्यात 35
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबारसह तिन्ही पालिकांच्या निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने मतदान केंद्र जाहीर केले आहेत. नंदुरबारात सर्वाधिक 126 मतदान केंद्र राहणार आहेत. नवापूरात 38 तर तळोद्यात 35 मतदान केद्र राहणार आहेत. प्रभागनिहाय मतदान केंद्र राहणार असून एका मतदान केंद्रात किमान 800 मतदारांची सोय होणार आहे.
जिल्ह्यातील नंदुरबारसह तळोदा व नवापूर पालिकांची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर महिन्यात होणार आहे. त्यासाठी निवडणूक विभागातर्फे विविध पातळीवर तयारी सुरू करण्यात आली आहे. आधी प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या, त्यानंतर त्यांच्यावर हरकती व सुचना मागविण्यात आल्या. गेल्या आठवडाभरापासून मतदान केंद्रांची चाचपणी करण्यात येत होती. त्याची यादीही अंतिम करण्यात आली आहे. शुक्रवारी मतदान केंद्रांची यादी जाहीर करण्यात आली आहे. एका मतदान केंद्रात किमान 800 मतदारांची सोय करण्यात आली आहे. त्यानुसार मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात आली आहे.
नंदुरबार पालिकाअंतर्गत एकुण 19 प्रभाग असून 39 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी एकुण 126 मतदान केंद्र राहणार आहेत. गेल्या वर्षापेक्षा यंदा मतदान केंद्रांमध्ये 14 ने वाढ झाली आहे. सर्व पालिका शाळांसह माध्यमिक शाळा, महाविद्यालये, सामाजिक सभागृहे आणि सार्वजनिक वापराच्या इमारतींमध्ये मतदान केंद्र राहणार आहे.
तळोदा येथे 35 मतदान केंद्र राहणार आहेत. या ठिकाणी एकुण नऊ प्रभाग आहेत. 18 नगरसेवकांना निवडून द्यायचे असून गेल्या पंचवार्षीकच्या तुलनेत यंदा चार मतदान केंद्र वाढले आहेत.
नवापूरात 10 प्रभाग 20 नगरसेवकांना निवडून द्यायचे असून 38 मतदान केंद्र राहणार आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत पाच मतदान केंद्र वाढले असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, मतदान केंद्रांची यादी त्या त्या पालिकांमध्ये लावण्यात आली आहे.
3 ऑक्टोबरपासून पालिका निवडणुकीची पूर्व तयारीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यात 3 ऑक्टोबर रोजी त्या तारखेपासून मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. 10 ऑक्टोबर रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. 17 ऑक्टोबर्पयत हरकती व सुचना स्विकारण्यात आल्या. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या तयार करण्याची तारीख 26 ऑक्टोबर तर मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक 28 ऑक्टोबर होता तर अंतिम मतदार यादी 31 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे