चायनीज खाताय की, पोटाच्या आजारांना निमंत्रण देताय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:34 AM2021-09-23T04:34:20+5:302021-09-23T04:34:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : भारतीय खाद्यपदार्थ अधिक मसालेदार असतात. त्या तुलनेत चायनीज पदार्थ अधिक तेलकट व मिळमिळीत असतात. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : भारतीय खाद्यपदार्थ अधिक मसालेदार असतात. त्या तुलनेत चायनीज पदार्थ अधिक तेलकट व मिळमिळीत असतात. त्यांना अधिक चविष्ट करण्यासाठी अजिनोमोटोचा वापर केला जातो. विविध आजार होत असल्यामुळे अजिनोमोटोचा आहारातील समावेश कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला आहारतज्ज्ञांकडून दिला जातो. परिणामी, आपण चायनीज पदार्थ खाताना पोटाच्या आजारांना निमंत्रण तर देत नाही ना, याचाही गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. विविध महत्त्वाच्या ठिकाणांसह रस्त्यारस्त्यांवर मॉल, हॉटेल्समध्ये त्याचप्रमाणे हातगाड्यांवर चायनीज पदार्थ विक्रीची दुकाने आढळून येतात. परिणामी, साहजिकच चायनीज पदार्थांना नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी वाढत चालली आहे. चायनीज खाद्यपदार्थांमध्ये अजिनोमोटोचा वापर करून विशिष्ट पदार्थांचे आकर्षण व चव वाढवले जाते. मोमोज, नूडल्स यासारख्या चायनीज पदार्थांचे हळूहळू लोकांना व्यसनच लागते. एखाद्या वेळी चायनीज पदार्थ खाण्याने काही बिघडत नाही; परंतु वारंवार खाण्याची सवय हानिकारक ठरू शकते.
काय आहे अजिनोमोटो
अजिनोमोटो ऊर्फ मोनोसोडियम ग्लुटामेट, हा ग्लुटामिक आम्लाचा सोडियम क्षार आहे. याचे रासायनिक सूत्र C5H8NO4Na असे आहे. अजिनोमोटोला चिनी मीठ असे म्हणतात. ते खास करून चिनी पाककृतींमध्ये वापरते जाते. ग्लुटामेटचे दोन प्रकार असतात. एक प्रथिनांशी बद्ध आणि दुसरा मुक्त. या मुक्त ग्लुटामेटमुळे पदार्थाला एक वेगळीच चव येते. याचा वापर चायनीज पदार्थांमध्ये प्रामुख्याने केला जातो याच्या अतिसेवनामुळे विविध आजार होण्याची शक्यता बळावते
म्हणून चायनीज खाणे टाळा
चायनीज पदार्थांमध्ये कच्च्या भाज्या, कृत्रिम रंगांचा वापर, सॉसेसचा आणि प्रिझर्व्हेवटिव्हचा सढळ वापर, भरपूर तेल वापरले जात असल्यामुळे जास्त प्रमाणात मिळणाऱ्या कॅलरीज हे सर्व शरीरासाठी घातक आहे. त्याचप्रमाणे पदार्थाची चव वाढविण्यासाठी अजिनोमोटो प्रत्येक पदार्थात वापरल्याने डोकेदुखी होते, काही वेळा अर्धशिशी होते.
चेतनापेशीवर परिणाम होतो व मान-चेहरा यांच्या संवेदना कमी होतात. पार्किन्सन, अल्झायमर व हटिंग्टन हे रोग होण्याची शक्यता वाढते. हृदयाचे ठोके बिघडतात व छातीत दुखू शकते. रक्तदाबास कारण ठरते. यामुळे शक्यतोवर चायनीज पदार्थ टाळलेच पाहिजेत.
डॉक्टर म्हणतात...
अजिनोमोटोच्या अतिसेवनाचा आकलनशक्ती आणि स्मरणशक्तीवर परिणाम होतो. शरीरात अतिप्रमाणात गेल्यास पॅनिक अटॅक येणे, गरगरणे, अशा समस्या वाढतात. लहान मुलांच्या आहारात अजिनोमोटो अधिक प्रमाणात जाणेदेखील त्रासदायक ठरू शकते. यामुळे लहान मुलांच्या वागण्यात प्रकर्षाने बदल होतात. अजिनोमोटोयुक्त अन्नपदार्थ सेवन केल्याने पोटाचे विकार होतात. आतड्यांसाठी ते घातक असून, भविष्यात अल्सरसुद्धा होऊ शकतो, असे पदार्थ खाणे टाळावे.
-डॉ. मणीलाल शेल्टे, वैद्यकीय अधिकारी, शहादा