ब्राम्हणपुरी येथे मंदीरातील दानपेटी फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 12:11 PM2017-11-09T12:11:20+5:302017-11-09T12:11:20+5:30
16 हजाराची होती रक्कम : भरदिवसा घटना घडल्याने परिसरात उडाली खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राम्हणपुरी : येथील दत्त मंदिरातील दानपेटी फोडून चोरटय़ांनी 16 हजार रुपये लंपास केल्याची घटना मंगळवारी निदर्शनास आली. याप्रकरणी म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदिवसा घटना घडल्यामुळे ब्राम्हणपुरीसह पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.
ब्राम्हणपुरी येथे श्री दत्ताचे मंदीर आहे. या ठिकाणी असलेले पुजारी पुरुषोत्तम चासुरकर हे आपल्या खाजगी कामानिमित्त मंगळवारी दुपारी दोन वाजता शहादा येथे गेले होते. सायंकाळी ते परत आले असता त्यांना मंदीरातील दानपेटी उघडी दिसली. जवळ जावून पाहिले असता दान पेटीची कडी तोडून चोरटय़ांनी रक्कम लंपास केल्याचे स्पष्ट झाले.
दानपेटी वर्षातून एकदा उघडली जाते. त्यामुळे या महिन्यातील शेवटच्या आठवडय़ात दानपेटी उघडली जाणार होती. त्यामुळे दरवर्षाच्या अंदाजाप्रमाणे दानपेटीत जवळपास 16 हजार रुपये असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पुजारी पासुरकर यांनी तातडीने ही बाब ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.अजित पाटील, उपाध्यक्ष अंबालाल पाटील, शंकर पाटील यांना कळविली. त्यांनी मंदीरात धाव घेवून पहाणी केली. त्यानंतर शहादा व म्हसावद पोलीस ठाण्यात याबाबत कळविण्यात आले.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. परिसरात गेल्या महिनाभरापासून भुरटय़ा चो:या वाढल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. चोरटय़ांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून होत आहे. अन्यथा आंदोलनाचाही इशारा देण्यात आला आहे.