जिल्ह्यात आता ‘ड्रॅगन फ्रूट’चा प्रयोगही यशस्वी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 07:09 PM2017-09-13T19:09:59+5:302017-09-13T19:11:08+5:30
शिंदे येथील शेतक:याचा उपक्रम : तीन एकर क्षेत्रात फुलवली ड्रॅगन फ्रूटची बाग
रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : स्ट्रॉबेरी, पपई, अॅपल बोर, चंदन नंतर आता ‘ड्रॅगन फ्रूट’ या विदेशी फळाचे उत्पादनही जिल्ह्यात यशस्वीपणे येऊ लागले आहे. शिंदे, ता.नंदुरबार येथील प्रयोगशील शेतक:याने हा प्रयोग केला असून त्यांनी तीन एकर क्षेत्रात या पिकाची बाग फुलवली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात सिंचनाची सुविधा पुरेशी नसली तरी येथील शेतकरी स्थानिक पातळीवर धडपड करीत शेतीचे नवनवीन प्रयोग करीत आहेत. विशेषत: फलोत्पादनातही येथील शेतकरी अग्रेसर आहेत. आंबा, केळी, चिकू, सिताफळ, बोर, डाळींबची शेती आता सर्वमान्य झाली आहे. त्यातूनच पुन्हा नवे प्रयोग शेतक:यांनी सुरू केले आहेत. काजूच्या बागा सातपुडय़ात बहरल्या असून त्याचे उत्पादनही सुरू झाले आहे. सातपुडय़ातील थंड हवामानात तेथील आदिवासी शेतकरी स्ट्रॉबेरी पिकवू लागले आहेत. सपाटीवरील शेतक:यांनी अॅपल बोरचा नवा प्रयोग पाच वर्षापूर्वी केला तोही आता रुढ झाला आहे. यावर्षी ड्रॅगन फ्रूटचा प्रयोग शिंदे ता.नंदुरबार येथील शेतकरी प्रकाश शिवदास पटेल यांनी राबविला आणि तो यशस्वीही झाला आहे.
शिंदे गावापासून व्यावल रस्त्यावर प्रकाश पटेल यांची 11 एकर शेती आहे. या शेतीत ते वेगवेगळे प्रयोग करतात. गेल्या वर्षी त्यांनी बँगलोरमधून ड्रॅगन फ्रूटचे रोप आणले. आपल्या तीन एकर क्षेत्रात या रोपांची बाग लावली. एकुण सहा हजार रोपे त्यांनी लावली आहेत. ही रोपे आठ बाय बारा फूट या प्रमाणात त्यांनी लागवड केली. एकाच ठिकाणी चार रोपे लावून त्या ठिकाणी सहा फूट सिमेंटचा खांब उभा केला. या खांबाला वरती मोटरसायकलचा निकामी टायर लावून त्याला छत्रीचा आकार दिला. वर्षभरात ही रोपे साधारणत: पाच ते सहा फूट उंचीर्पयत वाढली असून त्याला फळ धारणाही सुरू झाली आहे. नुकताच या बागेतून त्यांनी 800 फळे पहिल्या टप्प्यात उत्पादन घेतली असून ते मुंबईच्या व स्थानिक बाजारपेठेत विकले आहेत. एका फळाला त्यांना साधारणत: 80 ते 120 रुपये भाव मिळाला. या पिकाचे उत्पादन डिसेंबर्पयत सुरू राहणार आहे.
ड्रॅगन फ्रूट या फळझाडाला 25 वर्षार्पयत उत्पादन येते. दरवर्षी साधारणत: जून ते डिसेंबर या काळात त्याला फळधारणा होते. निवडूंगाच्या झाडाप्रमाणेच हे काटेरी झाड आहे. वर्षभरानंतर त्याला फळधारणा सुरू होते. पहिल्या वर्षी कमी फळधारणा होते. पण दुस:या वर्षापासून मात्र त्याचे उत्पादन दोन ते चार पटीने वाढते.
या संदर्भात संबधित शेतकरी प्रकाश पटेल यांनी सांगितले की, आपल्याला ड्रॅगन फ्रूट बाबत बँगलोरच्या एका शेतक:याने माहिती दिली होती. त्यांच्याच शेतात या पिकाची पहाणी करून आपणही आपल्या भागात हा प्रयोग राबवावा यासाठी त्याची रोप आणून लागवड केली. यापूर्वी याच शेतक:यांकडून आपण अॅपल बोरची रोपे आणली होती ती यशस्वी झाल्यामुळे हे पीक ही यशस्वी होईल याची खात्री होती. त्यामुळे त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर खर्च करून धाडस केले. त्याला मात्र आज यश आले आहे. तीन एकर क्षेत्रात सहा हजार रोपे लागली असून त्यासाठी 1500 सिमेंटचे खांब उभे केले आहेत. या पिकाला जास्त पाणी लागत नाही. ड्रिपने दर दोन, तीन दिवसात दोन ते तीन तास पाणी आपण देतो. आपण आपल्या शेतातील सर्व पिकांना गोमुत्र व जीवअमृत ड्रीपद्वारे देतो. कुठलेही रासायनिक खत वापरलेले नाही. याच बागेत आंतरपीकही घेता येते. आपण गेल्यावर्षी तूर लागवड केली होती. तीन एकर क्षेत्रातून 30 क्विंटल उत्पादन मिळाले होते. यावर्षी देखील तूर लागवड केली आहे. शिवाय ड्रॅगन फ्रूटचा झाडाजवळ तीन फूट अंतरावर शेवगा लावली आहे. हे झाड मोठे झाल्यावर ड्रॅगन फ्रूटच्या झाडाला सावली देवून उन्हातील होणारे नुकसान टळणार आहे. या फायद्याबरोबर उत्पादनही मिळणार आहे. शिवाय याच बागेत व्हीएनआर (थाई) या पेरूचा रोपांचीही लागवड केली आहे. यंदा ही रोपे लावली असून पुढील वर्षापासून त्याचेही उत्पादन सुरू होईल. त्यामुळे ड्रॅगन फ्रूटच्या शेतीत एकाच वेळी दोन फळांचे उत्पादन 25 वर्षार्पयत मिळणार आहे. तर दोन ते तीन वर्ष तूर किंवा इतर आंतरपिकाचे व शेवगाचे उत्पादनही मिळणार आहे. तसेच याच शेताच्या बांधावर महागुनीची 700 झाडे आपण लावली असून दहा वर्षानंतर त्याचे उत्पादन मिळणार आहे. या झाडाची उंची 70 फुटार्पयत वाढते. ड्रॅगन फ्रूट हे फळ खाण्यास चवदार असून आरोग्याच्या दृष्टीनेही त्याचे महत्व असल्याने त्याची मोठी मागणी असते.