स्वच्छ, सुंदर व हरीत नवापूरचे स्वप्न साकारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 01:02 PM2018-05-31T13:02:29+5:302018-05-31T13:02:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवापूरात सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. लवकरच सांडपाणी व्यवस्थापन, विस्तारीत पाणी पुरवठा योजना मार्गी लागणार आहे. त्यामुळे क्लिन आणि ग्रीन नवापूर साकारण्यावर आपला भर राहणार असल्याची माहिती नगराध्यक्षा हेमलता पाटील यांनी ‘लोकमत’ संवाद उपक्रमात बोलतांना दिली.
नवापूरच्या पहिल्या लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा हेमलता अजय पाटील यांनी बुधवारी ‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. वरिष्ठ उपसंपादक मनोज शेलार उपस्थित होते. यावेळी बोलतांना नगराध्यक्षा हेमलता पाटील यांनी सांगितले, नवापूरात पाच वर्ष वगळता कायमच काँग्रेसची सत्ता राहिली आहे. माजीमंत्री आमदार सुरुपसिंग नाईक, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. केवळ विस्तारीत पाणी पुरवठा योजना आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प या दोन बाबी बाकी होत्या, त्या देखील येत्या काळात पुर्ण होणार आहेत.
33 कोटींची पाणी योजना
नवापुरात जलशुद्धीकरण प्रकल्प तयार आहे. परंतु शहरात असलेल्या जुन्या पाईपलाईनमुळे शुद्ध पाणी पुरवठा करण्यावर मर्यादा येत आहे. त्यामुळे शहराची आगामी 20 ते 30 वर्षाची लोकसंख्या लक्षात घेवून विस्तारीत पाणी पुरवठा योजना राबविणार आहोत. सद्य स्थितीत नवापूर ग्रामपंचायत होती त्यावेळी टाकलेली पाईपलाईन कायम आहे. जलशुद्धीकरण माध्यमातून पाणी पुरवठय़ासाठी नवीन 33 कोटींची योजना प्रस्तावीत आहे. लवकरच ती मार्गी लागणार आहे.
सांडपाणी प्रकल्प
सद्य स्थितीत शहरातील सांडपाणी नदीत सोडावे लागत आहे. त्यामुळे प्रदुषण वाढते. परिणामी सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. शहरातील सर्व सांडपाणी एका ठिकाणी साठवून त्यापासून खत निर्मिती करण्यात येणार आहे.
रिक्त पदांची संख्या
पालिकेत रिक्त पदांची संख्या देखील मोठी डोकेदुखी आहे. बांधकाम, पाणीपुरवठा विभागाला अभियंता नाही. आस्थापनातील आठ जण सेवानिवृत्त झाल्यानंतर नवीन पदे भरली गेली नाहीत. त्यामुळे रोजंदारीवरील कर्मचा:यांवर काम भागवावे लागत आहे. याबाबत जिल्हाधिका:यांकडे वेळोवेळी पाठपुरावा सुरू आहे.
222 घरकुल मंजुर
पालिकेने घरकुलांसाठी अर्ज मागविले असता एकुण 2,218 जणांनी अर्ज केला होता. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 222 जणांचे अर्ज मंजुर करून घरकुल मंजुर झाले आहे. उर्वरित घरकुलेही लवकरच मंजुर करण्यासाठी जिल्हाधिका:यांकडे पाठपुरावा राहणार आहे.
क्लिन अॅण्ड ग्रीन
नवापूर शहर क्लिन अॅण्ड ग्रीन करण्यावर आपला भर राहणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील एक आदर्श कचरा व्यवस्थापन प्रकल्प नवापूर पालिका राबवीत आहे. कंपोष्ट खत निर्मिती करण्यात येत आहे. प्लॅस्टिक बंदीसाठी प्रभावी उपायोजना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी देखील आपले शहर स्वच्छ व सुंदर राहावे यासाठी पालिकेला सहकार्य करणे आवश्यक आहे.
शहर ग्रीन करण्यासाठी अर्थात जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्यासाठी पालिका सज्ज आहे. जिल्हाधिका:यांच्या आवाहनानुसार यंदाच्या पावसाळ्यात शहरातील सर्व ओपन प्लेस, सर्व रस्ते, शाळांच्या परिसरात वृक्षारोपण करण्यावर भर राहणार आहे. त्यासाठी रोपांची उपलब्धता देखील करून घेण्यात येत आहे. नागरिकांनी देखील एक व्यक्ती एक झाड हा संकल्प केला तर हरीत नवापूर होण्यास वेळ लागणार नाही.
सौर उज्रेला प्राधान्य
पालिकेचे वीज बील परवडणारे नाही. त्यामुळे किमान पथदिवे सौर उज्रेवर सुरू राहावे यासाठी सौर उर्जा प्रकल्प राबविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
मालमत्ता कराची वसुली केवळ 67 टक्के झाली आहे. विकास कामांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी थकीत कराची रक्कम तातडीने भरून सहकार्य करावे असे आवाहन देखील त्यांनी केले. यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती सारिका मनिष पाटील, अजय पाटील उपस्थित होते.