विना दरवाजा बस चालविण्यास नकार दिल्याने चालक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 12:26 PM2021-01-05T12:26:12+5:302021-01-05T12:26:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :  शहादा आगारातील विना दरवाजा असलेली बस चालविण्यास चालकाने नकार दिल्याने आगार प्रमुखांनी संबंधित चालकाच ...

The driver was suspended for refusing to drive the bus without a door | विना दरवाजा बस चालविण्यास नकार दिल्याने चालक निलंबित

विना दरवाजा बस चालविण्यास नकार दिल्याने चालक निलंबित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा :  शहादा आगारातील विना दरवाजा असलेली बस चालविण्यास चालकाने नकार दिल्याने आगार प्रमुखांनी संबंधित चालकाच निलंबित केल्याची घटना घडली. दरम्यान या घटनेबाबत चालकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
शहादा बस आगारातील एम.एच. २० डीएल- ३३९३ या क्रमांकाची बस प्रतिष्ठीत सेवा म्हणून शहादा-मुंबई  अशी दररोज सायंकाळी सात वाजता सुटते. सदर बस चालक अनिल मासूळ यांनी चालकाच्या बाजूला असलेला मुख्य दरवाजा नसल्याने बस चालविण्यास नकार दिला. परिणामी दररोज सायंकाळी सात वाजता सुटणारी ही बस सुमारे दोन तास उशिरा रात्री नऊ वाजता मुंबईसाठी  रवाना झाली. चालकाच्या या कृत्यामुळे परिवहन विभागाचे आर्थिक नुकसान झाले, त्याचप्रमाणे प्रवाशांचा विनाकारण दोन तास खोळंबा झाला या कारणावरून आगार प्रमुख योगेश लिंगायत यांनी चालक मासूळ यांना १७ डिसेंबर रोजी निलंबित करीत ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली. ही बस शहादा येथून मुंबई सेंट्रल येथे पोहोचल्यानंतर वरळी डेपोत जमा करावयाची  होती व दुसऱ्या दिवशी सायंकाळी सातच्या सुमारास ही बस शहाद्याला परत आणायची होती.
बस चालक मासूळ यांनी बस चालविण्यास नकार दिल्यामुळे आगार प्रमुखांनी दुसऱ्या चालकाला तात्काळ नियुक्ती करून दोन तासानंतर ही बस मुंबईसाठी रवाना झाली. शहादा आगारात अनेक बसेसला चालकाच्या बाजूचा पुढील दरवाजा नसल्याने त्या तशाच धावत असल्याचा आरोप चालकाने केला असून यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविली आहे.

कोरोना विषाणू संक्रमणाच्या काळात राज्य परिवहन महामंडळाने मुंबईच्या बेस्टशी करार केला असून महामंडळाच्या आदेशानुसार मुंबईला पाठविण्यात येणाऱ्या बसचा चालकाच्या बाजूला असलेला दरवाजा काढण्यात येत आहे. बसेसला डॉकिंग करण्यासह इतर तांत्रिक कारणासाठी दोन ते तीन महिन्यानंतर पुन्हा शहाद्याला आणणे गरजेचे असते. चालक मासूळ याने कारण नसताना बस चालविण्यास नकार दिला. त्यामुळे दोन तास प्रवाशांचा वेळ गेला व महामंडळाचे आर्थिक नुकसान झाले म्हणून त्यास निलंबित करण्यात आलेले आहे. बेस्टशी करार केल्यामुळे महामंडळाला अतिरिक्त उत्पन्न मिळत असून यातून कर्मचाऱ्यांचे पगार करणे शक्य होत आहे.
-योगेश लिंगायत, आगार प्रमुख, शहादा.


आरटीओच्या नियमानुसार चालकाच्या बाजूला असलेला पुढील दरवाजा बसला असणे आवश्यक आहे. प्रतिष्ठीत सेवेअंतर्गत शहादा ते मुंबई असा सुमारे साडेचारशे किलोमीटर अंतर प्रवास असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मी दरवाजा नसलेली बस चालविण्यास नकार दिला. अशी बस मी मुंबईला नेली असती तर माझा वाहन चालक परवाना आरटीओकडून निलंबित होण्याची शक्यता होती. परिणामी मी नकार दिला. मात्र आगार प्रमुखांनी  मला निलंबित केले आहे. 
-अनिल मासूळ, बस चालक, शहादा आगार.

Web Title: The driver was suspended for refusing to drive the bus without a door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.