मिरची आवक झाली यंदा दुप्पट
By admin | Published: March 4, 2017 12:58 AM2017-03-04T00:58:24+5:302017-03-04T00:58:24+5:30
नंदुरबार : मिरची हंगाम यंदा संपण्याच्या मार्गावर आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट खरेदी झाली आहे.
नंदुरबार : मिरची हंगाम यंदा संपण्याच्या मार्गावर आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट खरेदी झाली आहे. आतापर्यंत दोन लाख ५५ हजार क्विंटल मिरची खरेदी झालेली आहे. हंगाम संपेपर्यंत तीन लाख क्विंटलपर्यंत आकडा जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंदीमुळे भावदेखील समाधानकारक दिला जात नसल्यामुळे शेतकºयांमध्येही फारसे समाधानाचे वातावरण नसल्याची स्थिती आहे.
नंदुरबार हे मिरचीचे आगार म्हणून पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे. मध्यंतरी गेल्या आठ ते दहा वर्षात मिरचीची आवक कमी झाली होती. त्यामुळे येथील व्यापाºयांना आणि मिरची प्रक्रिया उत्पादकांना बाहेरून मिरची मागवावी लागत होती. परंतु यंदा मिरचीचे क्षेत्र दुप्पटीने वाढल्यामुळे आवक मोठ्या प्रमाणावर झाली. अगदी हिरवी मिरचीदेखील बाजार समितीत प्रथमच विक्रीस आली होती.
गेल्या वर्षाच्या तुलनेत जास्त
यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पटीने आवक झाली आहे. गेल्यावर्षी एक ते सव्वा लाख क्विंटल मिरची आवक झाली होती. यंदा हंगाम संपण्याअगोदरच तब्बल अडीच लाखापेक्षा अधिक आवक झाली आहे. आणखी दोन ते तीन आठवड्यात ४० ते ४५ हजार क्विंटल आवक गृहीत धरली तर यंदा तीन लाख क्विंटल आवक होण्याची अपेक्षा आहे. ही आवक गेल्या दहा वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक राहणार आहे.
सध्या दररोज अडीच ते तीन हजार क्विंटल आवक सुरू आहे. हंगामाच्या सुरुवातीला हीच आवक चार ते पाच हजार क्विंटलपर्यंत जात होती. हंगामाच्या शेवटपर्यंत ती दैनंदिन दीड हजार क्विंटलपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
भाव दोलायमान
यंदा मिरचीचे भाव दोलायमान राहिले. सुरुवात मिरचीच्या प्रतवारीनुसार १२०० ते १९०० रुपये क्विंटलपर्यंत होते. त्यानंतर त्यात वाढ होऊन २२०० रुपयांपर्यंत गेले. सध्यादेखील १४०० ते २२०० रुपये क्विंटल दरम्यान भाव दिला जात आहे.
व्यापारी घटले
सुरुवातीला मिरची खरेदी करणाºया व्यापाºयांची संख्या १५ पेक्षा अधीक होती. परंतु यंदा मिरचीची आवक व त्यानुसार झालेली खरेदी लक्षात घेता काही व्यापारी कमी झाले. त्यामुळे आताच्या स्थितीत केवळ सात ते आठच व्यापारी खरेदीदार आहेत. त्यामुळे मिरची खरेदीच्या आणि उलाढालीतदेखील परिणाम झाला आहे.
मंदीचे सावट
यंदा मिरची उलाढालीत मंदीचे सावट कायम राहिले. हंगामाच्या सुरुवातीलाच नोटा बंदीमुळे खरेदी काही दिवस बंद राहिली. त्यामुळे शेतकºयांना आपल्या शेतातच मिरची वाळवावी लागली. त्यानंतर खरेदी-विक्रीला सुरुवात झाली असली तरी मंदीचे सावट कायम होते.
शेतकºयांना रोखीने पेमेंट ऐवजी चेकद्वारे ते दिले जात होते. चेकदेखील बँकामध्ये रोख रक्कमेच्या अभावामुळे दोन ते तीन आठवडे वटतच नव्हते. परिणामी शेतकºयांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.
दोंडाईचा मार्केटबंद
दोंडाईचा मार्केटमधील मिरची खरेदी कमी झाली आहे. तेथे देखील खरेदीदार व्यापारी नसल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे.परिणामी त्या भागातील लाल मिरचीदेखील नंदुरबार बाजार समितीत येत असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी दिली.
मिरचीच्या दाहकतेचा वाहनचालकांना त्रास
मिरची व्यापाºयांच्या पथारीचा वाद पुढील वर्षी ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. मिरची पथारी असलेल्या भागात मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती झाली आहे. शिवाय वळण रस्तादेखील गेला आहे. त्यामुळे मिरचीच्या दाहकतेचा त्रास होत आहे. पूर्वी या भागात नागरी वस्ती नव्हती. वळण रस्त्यावरदेखील फारशी रहदारी राहत नव्हती. आता परिस्थितीत बदल झाला आहे. सध्या कडक ऊन पडत असल्यामुळे आणि वाºयाचा वेग जास्त राहत असल्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय परिसरातील वसाहतींमध्ये राहणाºया लोकांनादेखील मिरचीच्या दाहचा त्रास होऊ लागला आहे. आधीच या भागातील नागरिकांनी मिरची पथारी इतरत्र हलविण्याची मागणी केली होती. परिणामी पुढील वर्षी ही समस्या आणि जागेचा मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.