मिरवणुकांवर बंदी असल्याने परस्पर होणार गणेशमूर्ती विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:31 AM2021-09-19T04:31:38+5:302021-09-19T04:31:38+5:30

नंदुरबार : गणेशोत्सवांतर्गत अंतिम टप्प्यातील गणेशमूर्ती विसर्जन आज, रविवारी होत आहे. त्यामुळे नंदुरबारसह शहादा, तळोदा, नवापूर, आदी ठिकाणी तयारी ...

Due to the ban on processions, immersion of Ganesha idols will take place | मिरवणुकांवर बंदी असल्याने परस्पर होणार गणेशमूर्ती विसर्जन

मिरवणुकांवर बंदी असल्याने परस्पर होणार गणेशमूर्ती विसर्जन

Next

नंदुरबार : गणेशोत्सवांतर्गत अंतिम टप्प्यातील गणेशमूर्ती विसर्जन आज, रविवारी होत आहे. त्यामुळे नंदुरबारसह शहादा, तळोदा, नवापूर, आदी ठिकाणी तयारी करण्यात आली आहे. पालिकांनी आपल्या क्षेत्रात कृत्रिम तलाव तयार केले आहेत. मिरवणुकांवर बंदी असल्याने सर्वच मंडळे व खासगी गणेश मंडळे परस्पर मूर्ती विसर्जन करणार आहेत. दरम्यान, नंदुरबारातील दादा व बाबा गणपती यांची हरिहर भेट यंदाही होणार नसल्याचे स्पष्टच आहे. नंदुरबारातील सर्वच मानाचे गणपती तसेच इतर मोठ्या मंडळांतर्फे अनंत चतुदर्शीच्या दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. यंदा मिरवणुकांवर बंदी असल्याने साध्या पद्धतीनेच विसर्जन होणार आहे. त्या दृष्टीने नियोजनही करण्यात आले आहे. असे असले तरी दादा व बाबा गणपतींचा रथ हा त्यांच्या नेहमीच्या पारंपरिक मार्गाने निघणार आहे. इतर मंडळे देखील आपल्या भागात फिरून लागलीच परस्पर विसर्जन करणार आहेत. मंडळांनी मिरवणुका काढू नये, वाजंत्री वाजवू नये यासाठी पोलिसांतर्फे विशेष दक्षता घेतली जात आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील वाढविण्यात येणार आहे.

पूर्वसंध्येला पोलिसांचा रूट मार्च

अनंत चतुदर्शीच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी पारंपरिक मिरवणूक मार्गावर रूट मार्च केला. याशिवाय संवेदनशील भागात देखील हा रूट मार्च नेण्यात आला. यावेळी स्थानिक पोलीस, एस.आर.पी.एफ.चे जवान, होमगार्ड सहभागी झाले होते.

हरिहर भेट नाही

यंदाही दादा व बाबा गणपतींची हरिहर भेट होणार नसल्याचे स्पष्टच आहे. कारण मिरवणुकांवर बंदी असल्यामुळे भेटदेखील होणार नाही. गेल्यावर्षी देखील भेट झाली नव्हती. मात्र, दोन्ही मंडळांचे रथ हे पारंपरिक मार्गाने निघतील. त्यासाठी सकाळी साडेनऊ वाजेपासूनच रथ काढला जाईल असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे सायंकाळपर्यंत दोन्ही मानाच्या गणपतींचे विसर्जन होण्याची शक्यता आहे. दरवर्षी मिरवणूक मार्गावर अग्रभागी दादा गणपती असतो. त्यामागे इतर मानाचे गणपती व सार्वजनिक गणेश मंडळे व तालीम संघांचा समावेश असतो. रात्री साडेआठ ते दहा वाजेच्या सुमारास जळका बाजारात दादा व बाबा गणपतींची हरिहर भेट झाल्यानंतर पुढील मिरवणुकांना गती येते अशी परंपरा आहे. परंतु, दोन वर्षांपासून ही परंपरा कोरोना काळामुळे बंद झाली आहे.

कृत्रिम तलाव व मूर्ती संकलन केंद्र

नंदुरबार पालिकेने तीन ठिकाणी कृत्रिम तलाव तयार केले आहेत. त्यात गजानन महाराज मंदिराजवळ, वैशालीनगर व सी.बी. पेट्रोल पंपामागे हे तलाव राहणार आहेत. नागरिकांनी याच ठिकाणी मूर्ती आणून विसर्जन करावे असे आवाहन पालिकेने केले आहे. याशिवाय तीन ठिकाणी मूर्ती संकलन देखील करण्यात येणार आहे. मूर्ती संकलन करून त्यांचे विधिवत विसर्जन केले जाणार असल्याचे पालिकेने सांगितले. पाचव्या दिवसाच्या विसर्जनप्रसंगी चांगला प्रतिसाद मिळालेला होता.

Web Title: Due to the ban on processions, immersion of Ganesha idols will take place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.