पावसामुळे वाण्याविहीर येथे घर कोसळल्याने नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 01:17 PM2018-07-22T13:17:41+5:302018-07-22T13:17:48+5:30
आई व मुलगा जखमी : वाण्याविहीर येथील घटना
वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर येथे जोरदार पावसामुळे शनिवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद मराठी शाळेजवळील संतोष धोंडू कदम यांचे कौलारू घर अचानक कोसळून आई व मुलगा जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेत घरातील संसारोपयोगी साहित्याचेही मोठे नुकसान झाले.
वाण्याविहीर गावातील ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद मराठी शाळेजवळ हातमजुरी करून उदरनिर्वाह करणा:या संतोष धोंडू कदम (मराठे) यांचे कौलारू घर होते. येथे पावसाची संततधार सुरू असून शनिवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास हे कौलारू घर अचानक कोसळले. त्यावेळी घरात संतोष धोंडू कदम, वंदना संतोष कदम, स्वाती संतोष कदम व कृष्णा संतोष कदम झोपले होते. घर कोसळल्याने वंदना संतोष कदम (42) व मुलगा कृष्णा संतोष कदम (12) यांना डोक्याला किरकोळ मार लागल्याने दुखापत झाली आहे.
या घटनेत घरातील संसारोपयोगी साहित्याचेही मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असून कदम यांचा संसार उघडय़ावर आला आहे. हातमजुरी करून उदरनिर्वाह करणा:या या कुटुंबाला शासनाने त्वरित आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.