दूषित पाण्यामुळे कहाटूळला अतिसारची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 11:10 AM2018-10-16T11:10:17+5:302018-10-16T11:10:23+5:30
नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू : 50 रुग्णांवर उपचार सुरू, वैद्यकीय पथक दाखल
सारंगखेडा : शहादा तालुक्यातील कहाटूळ येथे दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याने अतिसारची लागण होऊन नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला तर 50 रुग्णांवर कहाटूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. दोन गंभीर रुग्णांना खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, कहाटूळ येथे दूषित पाणीपुरवठा झाल्याने रविवारी काही ग्रामस्थांना जुलाब व उलटीचा त्रास सुरू झाला. रविवारी दुपारी चार वाजेपासून रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येऊ लागले. रात्रीर्पयत या रुग्णांची संख्या 50 र्पयत पोहोचली. त्यात नातेवाईकांकडे आलेल्या मेंद्राणा (मध्य प्रदेश) येथील नऊ वर्षीय बालक करण गणेश भील याचा मृत्यू झाला तर दोन गंभीर रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोग्य केंद्रात जनरल वॉर्ड, कर्मचारी निवासस्थान, ओटय़ांवर व टेंट लावून रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य केंद्रात दाखल रुग्णांवर वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र वळवी, डॉ.सी.के. सामुद्रे, डॉ.वंदना मावची व डॉ.आर.पी. पाटील यांच्यासह 15 कर्मचा:यांकडून उपचार सुरू आहेत. आरोग्य कर्मचारी अथक प्रयत्न करून साथ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत असून या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेची एकच तारांबळ उडाली.
आमदारांची भेट
या घटनेची दखल घेत आमदार डॉ.विजयकुमार गावीत व आमदार उदेसिंग पाडवी यांनी तातडीने गावाला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. त्यांनी ग्रामसेवक व ग्रामपंचायत पदाधिका:यांकडून पाणीपुरवठय़ासंदर्भात माहिती जाणून घेऊन पाणीपुरवठा त्वरित थांबविण्याची सूचना देऊन हलगर्जीपणामुळे संबंधितांना तंबी दिली. पाणीपुरवठा करणा:या विहिरीची साफसफाई करणे, जलवाहिनीतील लिकेज काढणे, पाण्यात टीसीएल पावडर वापरून पाणीपुरवठा करण्याचे सांगितले. तर आमदार पाडवी यांनी ग्रामसेवकाला टीसीएल पावडर वापरतात का, पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते का अशी विचारणा केली असता ग्रामसेवकांनी सांगितले की, पाण्याचे नमुने प्राथमिक आरोग्य केंद्राकडे तपासणीसाठी दोन महिन्यापूर्वी पाठविले होते. परंतु अद्याप अहवाल प्राप्त झाला नाही, असे सांगितले. यावर वैद्यकीय अधिका:यांनी सांगितले की, अहवाल दिला असून ग्रामसेवकाची अहवालाची प्रत मिळाल्याची सही असल्याचे सांगितले. या वेळी जि.प. सदस्य अभिजित पाटील, डॉ.कांतीलाल टाटीया, डॉ.किशोर पाटील, अनिल भामरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एन.डी. बोडके, गटविकास अधिकारी श्रीराम कागणे, तहसीलदार मनोज खैरनार, पं.स. सभापती दरबारसिंग पवार, सहायक गटविकास अधिकारी गोसावी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र पेंढारकर आदी उपस्थित होते.
साथ आटोक्यात आणण्यासाठी
आरोग्य विभागाचे प्रयत्न
कहाटूळ येथील अतिसारची साथ आटोक्यात आली असून दूषित पाण्यामुळे ही लागण झाल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र पेंढारकर यांनी सांगितले. कहाटूळ गावाला पाणीपुरवठय़ासाठी लोंढरे गावाजवळ योजना आहे. तेथून गावातील जुन्या विहिरीत पाणी साठवून त्याद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या विहिरीत घाण असल्याने व जलवाहिनीही ब:याच ठिकाणी उघडी व लिकेज झाली आहे. गावात अनेक नळांना तोटय़ाच नाहीत. त्यामुळे दूषित पाणीपुरवठा होऊन अतिसारची लागण झाल्याचे डॉ.पेंढारकर यांनी सांगितले.
जिल्हा साथ नियंत्रण अधिकारी डॉ.नारायण बावा यांनी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांची बैठक घेऊन पाणी उकळून प्यावे, स्वच्छता ठेवावी व भीती न बाळगण्याचे आवाहन केले. गावात सव्रेक्षण करून घरोघरी टीसीएल पावडरचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, कहाटूळ गावात अतिसारची लागण झाल्यानंतर ग्रामपंचायतीकडून विहीर स्वच्छ करून इतर उपाययोजना करण्यात आल्या. मात्र वेळीच लक्ष दिले असते तर ही घटना टाळता आली असतील. ग्रामपंचायतीतील टीसीएल पावडरचे रजिस्टर चेक केले असता जुलैपासून टीसीएल साठा व त्याचा वापर झालेला नाही, असे आढळून आले. तसेच मुदत संपलेला टीसीएल पावडरचा साठा मिळून आला.