डॉक्टरांच्या संपामुळे शासकीय रुग्णालयात गर्दी

By admin | Published: March 24, 2017 12:17 AM2017-03-24T00:17:46+5:302017-03-24T00:17:46+5:30

डॉक्टरांवरील वाढते हल्ले व त्यावर उपाययोजना करण्यात आलेले अपयश याच्या निषेधार्थ डॉक्टरांनी पुकारलेल्या बंदला जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

Due to a doctor's injuries, government hospital rush | डॉक्टरांच्या संपामुळे शासकीय रुग्णालयात गर्दी

डॉक्टरांच्या संपामुळे शासकीय रुग्णालयात गर्दी

Next

 

नंदुरबार : डॉक्टरांवरील वाढते हल्ले व त्यावर उपाययोजना करण्यात आलेले अपयश याच्या निषेधार्थ डॉक्टरांनी पुकारलेल्या बंदला जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वच लहान, मोठे हॉस्पिटल  गुरुवारी बंद होते. परंतु अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आली होती. त्यामुळे रुग्णांचे काही प्रमाणात हाल झाले. परिणामी शासकीय रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमध्ये  रुग्णांची गर्दी झाली  होती.
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात डॉक्टरांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. शासन त्यावर उपाययोजना करण्यात दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे डॉक्टरांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागते. यावर सक्तीची उपाययोजना करावी यासह इतर मागण्यांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे रुग्णालये बंद ठेवून संप पुकारण्यात आला. त्याला निमा, आयडीए, एचआयएमए, माडा व युनानी डॉक्टर असोसिएशनने पाठिंबा दिला. बुधवारी दुपारपासून जिल्हाभरातील खासगी डॉक्टरांनी संपात सहभाग घेतला आहे. गुरुवारीदेखील संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, राज्यात डॉक्टर्स व हॉस्पिटलवर रुग्णांच्या नातेवाइकांकडून हल्ले होत आहेत. शिवाय शासनाने निवासी डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई केली आहे. त्याच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आला. शासन याबाबत ठोस पावले उचलत नाहीत. अशा दहशतीच्या वातावरणात डॉक्टरांना पेशंटच्या हिताचा योग्य निर्णय घेणे व उपचार करणे शक्य होत नसल्याने संपाचा निर्णय घ्यावा लागत आहे. रुग्णांच्या गैरसोयीबद्दल असोसिएशनला खेद असून, अत्यावश्यक सेवा मात्र सुरू ठेवण्यात आली असल्याचे या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. पत्रकावर आयएमए, निमा, आयडीए, एचआयएमए, माडा व युनानी डॉक्टर असोसिएशन अध्यक्षांच्या सह्या आहेत.
संघटनेचे सर्वच सदस्य सहभागी
इंडियन मेडिकल असोसिएशनचे जिल्हाभरात दीडशेपेक्षा अधिक सदस्य आहेत. शिवाय संलग्न संघटनादेखील आहेत. असोसिएशनच्या आवाहनानुसार सर्वच सदस्यांनी संपात सहभाग घेतला. त्यामुळे जिल्हाभरातील लहान, मोठी सर्वच रुग्णालये गुरुवारी सकाळपासूनच बंद होती. सर्वच डॉक्टरांनी आपल्या रुग्णालयाबाहेर बंदचे बोर्ड लावले होते. अत्यावश्यक सेवा मात्र सुरू ठेवण्यात आली होती. त्यामुळे रुग्ण येऊन फिरून जात होते. जे रुग्ण आधीपासूनच आॅपरेशन करून किंवा इतर उपचारासाठी दाखल आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परंतु बुधवारी दुपारपासून बाह्यरुग्ण (ओपीडी) विभाग बंदच ठेवण्यात आला.
शासकीय रुग्णालयात गर्दी
जिल्हा रुग्णालयात तसेच आरोग्य केंद्रांमध्ये यामुळे मात्र रुग्णांची गर्दी वाढली होती. खासगी रुग्णालयात आलेले रुग्ण नंतर थेट जिल्हा रुग्णालयात जात होते. परिणामी जिल्हा रुग्णालयातील ओपीडी गुरुवारी वाढली होती.
संप लक्षात घेता जिल्हा रुग्णालय, सर्व उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांना स्थानिक ठिकाणी थांबण्यास सांगण्यात आले आहे. सुटीही रद्द करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये यांनी दिली.

डॉक्टरांचा संप लक्षात घेता जिल्हा रुग्णालयात पर्याप्त व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी जिल्हा रुग्णालयातील ओपीडी वाढण्याची अपेक्षा होती. परंतु फारसा फरक पडलेला नाही. सर्व शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना स्थानिक ठिकाणी थांबण्यास सांगण्यात आले आहे.
-डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा शल्य चिकित्सक, नंदुरबार.

Web Title: Due to a doctor's injuries, government hospital rush

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.