ग्रामपंचायत निवडणुकांमुळे गावशिवारात गजबज वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:26 AM2021-01-14T04:26:18+5:302021-01-14T04:26:18+5:30
शहादा तालुक्यातील यंदाची निवडणूक बऱ्याच दृष्टींनी उमेदवारांसाठी ऐतिहासिक अशीच ठरली आहे. प्रामुख्याने कोरोनाकाळात उमेदवारांची प्रचार करण्याची पद्धत वेगळी ठरली ...
शहादा तालुक्यातील यंदाची निवडणूक बऱ्याच दृष्टींनी उमेदवारांसाठी ऐतिहासिक अशीच ठरली आहे. प्रामुख्याने कोरोनाकाळात उमेदवारांची प्रचार करण्याची पद्धत वेगळी ठरली होती. संसर्गाची भीती असल्याने बरेचजण मास्क आणि सॅनिटायझर लावत प्रचार करीत असल्याचे दिसून आले. लॉकडाऊननंतर प्रथमच सार्वजनिकरीत्या एकत्र फिरणे शक्य झाल्याने बाहेरगावी नोकरी करणारे अनेकजण रजा काढून गावात परतले होते. यातून गावाबाहेर मुख्य रस्त्यांवरच्या हाॅटेल्समध्ये तळिरामांची मोठी गर्दी उसळत असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, शहादा तालुक्याच्या विविध गावांमध्ये नोकरी, व्यवसायानिमित्ताने बाहेरगावी गेलेल्यांनी खास निवडणुकीसाठी गावात हजेरी लावली आहे. यातून त्यांचीही दररोज चंगळ होत असल्याचे दिसून आले आहे. दर दिवशी उमेदवाराला कार्यकर्ते पोसण्याचा अधिक खर्च करावा लागत असल्याने आर्थिक खर्चाचे आकडेही फुगत असल्याचे दिसून आले आहे. याचा फटका पॅनलप्रमुखालाच अधिक बसत असला तरी, उमेदवार निवडून आल्यावर पाहू, अशी भूमिका घेत खर्चाला वाट करून देत आहेत. तोरखेडा येथील ग्रामपंचायत निवडणूक यंदाही चुरशीची होण्याची शक्यता असल्याने उमेदवार एक-एक मतासाठी जोर लावत आहेत. यात प्रामुख्याने बाहेरगावी राहणाऱ्या असंख्य मतदारांना परत येण्याची गळही घालण्यात येत आहे. तालुक्यातील इतर गावांमध्ये प्रचारतोफा बुधवारी थंडावल्यानंतरही अनेक ठिकाणी जेवणावळींचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मर्जीतील खास कार्यकर्ते आणि उमेदवार यांचाच समावेश यात करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.