अतिवृष्टीमुळे जिल्हा जलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 12:05 PM2019-08-05T12:05:06+5:302019-08-05T12:05:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हाभरात अतिवृष्टीमुळे रविवारी जनजिवन ठप्प झाले होते. सर्वच लहान मोठय़ा नदी, नाल्यांना पूर आल्याने ...

Due to heavy rainfall, the district is wet | अतिवृष्टीमुळे जिल्हा जलमय

अतिवृष्टीमुळे जिल्हा जलमय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हाभरात अतिवृष्टीमुळे रविवारी जनजिवन ठप्प झाले होते. सर्वच लहान मोठय़ा नदी, नाल्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी पाणीबाणीची स्थिती झाली. 100 पेक्षा अधीक घरांची पडझड झाली असून शेकडो हेक्टर पीक पाण्याखाली गेले आहे. नवापूर, तळोदा येथे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले. जिल्ह्यातील पाच महत्त्वाचे रस्ते वाहतूकीसाठी रविवार सायंकाळी उशीरार्पयत बंद होते. दरम्यान रविवारी  सकाळी आठ ते दुपारी 1 वाजेर्पयत जिल्ह्यात तब्बल 318 मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली.
जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. शनिवारी रात्रीपासून मात्र पावसाचा जोर अधीकच वाढला. परिणामी जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली. नंदुरबार व शहादा तालुका वगळता सर्वच तालुक्यांमध्ये 80 मि.मी.पेक्षा अधीक पाऊस झाला. तर रविवारी सकाळी आठ ते दुपारी एक वाजेर्पयत पावसाचा जोर अधीक असल्यामुळे तब्बल 318 मि.मी.पाऊस नोंदला गेला. यामुळे जिल्ह्यातील तापीसह गोमाई, सुसरी, रंगावली, पाताळगंगा, अमरावती, उदय या नद्यांना पूर आला. 
शेकडो घरांचे नुकसान
संततधार व मुसळधार पावसामुळे जिल्हाभरात 100 पेक्षा अधीक घरांचे नुकसान झाले. काही घरे संपुर्णपणे जमिनदोस्त झाली तर काही घरांच्या भिंती, छत पडले. यामुळे अनेकांना उघडय़ावर राहावे लागले. स्थानिक ठिकाणी शाळा, ग्रामपंचायत, समाज मंदीर अशा ठिकाणी गावक:यांनी नुकसानग्रस्तांची सोय करून दिली. नंदुरबार तालुक्यात 35 पेक्षा अधीक घरांचे अंशत: व पुर्णत: नुकसान झाल्याची नोंद झाली आहे. 
पिके पाण्याखाली
मुसळधार पावसामुळे शेत, शिवारातील नाल्यांनी आपला प्रवाह बदलला. परिणामी अनेक शेतांमध्ये पाणी शिरल्याने त्यांना तलावाचे स्वरूप आले होते. तर काही शेतांमधील पिके आणि माती वाहून गेल्याने शेतांनाच नाल्याचे स्वरूप आले आहे. परिणामी शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे.
दळणवळण ठप्प
जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्गावरील फरशीपूलांवरून पाणी गेल्याने तसेच काही ठिकाणी पूल, रस्त्यांचे भराव वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. अंकलेश्वर-ब:हाणपूर रस्त्यावरील फरशी पुलाचा भराव वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक रविवारी दुपारपासून ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनांच्या मोठय़ा रांगा लागल्या होत्या तर काही वाहने दोंडाईचा, नंदुरबारमार्गे अक्कलकुवाकडे जात होती.
नवापूर-पिंपळनेर मार्गावरील नवापूरनजीक नदीवरील पुलावरून पाणी जावू लागल्याने या मार्गावरील वाहतूक देखील दुपारपासून बंद झाली होती. धडगाव तालुक्यातील उदय नदीला पूर आल्याने धडगाव-चांदसैली-तळोदा मार्गावरील वाहतूक दिवसभर बंद होती. देवगोई घाटात दरड कोसळल्याने अक्कलकुवा-मोलगी मार्गावरील वाहतूक तुरळक स्वरूपाची होती. 
धुळे-सुरत महामार्गावरील कोंडाईबारी ते चिंचपाडा र्पयतच्या रस्त्याची वाट लागल्याने या मार्गावरील वाहतूक अतिशय संथगतीने सुरू ठेवण्यात आली होती.
याशिवाय ग्रामिण भागातील अनेक ठिकाणचे रस्ते पाण्यामुळे बंद झाले होते. 
प्रकल्पांमध्ये पाणीसाठा
आजच्या पावसामुळे  जिल्ह्यातील जवळपास सर्वच लघु व मध्यम प्रकल्पांमधील पाणी  साठय़ाची  स्थिती समाधानकारक होती.   रंगावली मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे तर ढोंग, खोकसा,   भुरीवेल या प्रकल्पांमध्ये 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. तर इतर     सहा प्रकल्पांमध्ये 80 टक्केपेक्षा अधीक पाणी साठा झाला आहे.


शनिवारी सायंकाळपासून रविवार दुपार्पयत अतिवृष्टीची नोंद झालेल्या महसूल मंडळांमध्ये नंदुरबार तालुक्यातील धानोरा, नवापूर तालुक्यातील नवापूर, नवागाव, चिंचपाडा, विसरवाडी व खांडबारा. तळोदा तालुक्यात तळोदासह बोरद, सोमावल, प्रतापपूर, बोरद. धडगाव तालुक्यात रोषमाळ, चूलवड, खुंटामोडी. अक्कलकुवा तालुक्यात अक्कलकुवासह खापर, मोरंबा, डाब, मोलगी, वडफळ्या या मंडळांमध्ये 24 तासात 65 मि.मी.पेक्षा अधीक पाऊस झाला आहे. 
तालुकानिहाय पजर्न्याची आकडेवारी पहाता नंदुरबार व शहादा तालका वगळता सर्वच तालुक्यांमध्ये 24 तासात 80 मि.मी.पेक्षा अधीक पाऊस झाला आहे. त्यात नवापूर तालुक्यात 105 मि.मी.,तळोदा तालुक्यात 97.63 मि.मी, धडगाव तालुक्यात 79.19 मि.मी तर अक्कलकुवा तालुक्यात 138.96 मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर नंदुरबार तालुक्यात 52.96  तर शहादा तालुक्यात 35.08 मि.मी.पाऊस झाला. 
रविवारी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेर्पयत जिल्ह्यात 318 मि.मी.पाऊस झाला. त्यात नंदुरबार 31 मि.मी, नवापूर 52 मि.मी., तळोदा 39 मि.मी., अक्कलकुवा 73 मि.मी., शहादा 34 मि.मी., तर धडगाव तालुक्यात 89 मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली. 

जिल्ह्यात शनिवारपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने नदीकिनारी राहणा:या जनतेने सतर्कता बाळगावी. पूर बघण्यासाठी पाण्याजवळ जाऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे. पावसामुळे पाण्यात दूषित घटक मिसळण्याची शक्यता लक्षात घेता पाणी गाळून व उकळून प्यावे. घराजवळ पाणी जमा होऊ देवू नये. घरातील जुनी भांडी, जुने टायर यात पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी. पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहन नेण्याचे धाडस करू नये. मदत व बचाव कार्यात प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. अधिकारी आणि कर्मचा:यांनी मुख्यालय सोडू नये व  मदत करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

अतिवृष्टीत तळोदा तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. शहरातील अनेक भागात पाणी शिरले. काही घरांमध्ये पाणी घुसल्याने नुकसान झाले आहे. सहायक जिल्हाधिकारी, तहसीलदार, पालिका मुख्याधिकारी तळ ठोकून आहेत. प्रशासकीय यंत्रणा सतर्क आहे. मोड पुनर्वसन, रेवानगर, त:हावद पुनर्वसन आदी ठिकाणच्या वस्तींमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. मंडळ अधिकारी यांनी पंचनामा सुरू केला आहे. 
नवापूर येथील नदीकाठावरील घरांमध्ये पाणी शिरले आहे. रंगावली आणि खर्डी नदीला पूर आल्याने वाहतूक देखील ठप्प आहे. 
नंदुरबार तालुक्यातील पिंपळोद, कोठली, नटावद येथील गाव तलाव ओसंडून वाहत आहेत. 
रंगावली नदीची पाणी पातळी रात्री पुन्हा वाढल्याने या महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. शिवाय दवंडी देवून काठावरील नागरिकांना सजग केले जात आहे. 
 

Web Title: Due to heavy rainfall, the district is wet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.