बिबटय़ांचा संचार वाढल्याने नागरिकांमध्ये भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 01:13 PM2019-01-21T13:13:38+5:302019-01-21T13:13:42+5:30
तळोदा तालुका : गावालगतच्या शेतशिवारात बिबटय़ा व त्याच्या पिल्लूंचे वास्तव
तळोदा : गावाला लागून असलेल्या शेत शिवारात दिवसा ढवळ्या बिबटय़ा व त्याच्या पिल्लांचा संचार वाढल्यामुळे बोरद परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. विशेष म्हणजे या शेताला लागूनच शाळेचे पंटागण आहे. याठिकाणी विद्यार्थी खेळत असतात. साहजिकच त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. वनविभागाने याप्रकरणी गंभीर दखल घेवून तातडीने हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
बोरद येथील शेतकरी सातपुडा साखर कारखान्याचे संचालक सुनील मुरार पाटील यांचे गावाला लागून शेत आहे. या क्षेत्रात त्यांनी केळीची लागवड केली आहे. त्यामुळे या केळीच्या शेतात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट मादी व तिच्या पिल्लांचा वावर आहे. अगदी दिवसा ढवळ्या हे प्राणी या शेताला लागून असलेल्या मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या पटांगणात सुद्धा वावरत असल्याचे गावक:यांच्या निदर्शनात आले आहे. त्यांच्या मुक्त संचारामुळे साहजिकच बोरद परिसरातील गावक:यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या बिबटय़ाने शुक्रवारी दोन शेळ्यादेखील फस्त केल्या होत्या. बिबटय़ाच्या भीतीमुळे शेतातील रखवालदार शेतात जाण्यास धजावत नसल्यामुळे गहू, हरभरा, पपई, केळी आदी पिकांना पाणी देताना शेतक:यांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. ऊसतोड मजुरांनीदेखील तेथून पळ काढला आहे. त्यांनी गावात आपले बिस्तार बसविले आहे. त्यांनी ऊस तोड थांबविल्यामुळे उसाच्या तोडी बंद झाल्या आहेत.
वास्तविक या हिंस्त्र प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याबाबत येथील वनविभागाकडे अनेक वेळा तोंडी, लेखी तक्रारी केल्या आहेत. तरीही वनविभागाने तातडीने कार्यवाही केलेली नाही. वनविभागाचे अधिकारी जीवित हानी होण्याची वाट पहात आहेत का? असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. वनविभागाने तत्काळ दखल घेवून बंदोबस्त करावा अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा गावक:यांनी केला आहे.