लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे व्हॅनवाले काका करताहेत मजूरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 12:59 PM2020-07-26T12:59:34+5:302020-07-26T12:59:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने त्यावर आधारित पूरक रोजगारही बंद पडले आहेत़ यात भल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने त्यावर आधारित पूरक रोजगारही बंद पडले आहेत़ यात भल्या पहाटे विद्यार्थ्यांना आवाज लगावत शाळेत घेऊन जाणाऱ्या ‘व्हॅनवाले काकां’चाही समावेश असून चार महिन्यात आर्थिक गणिते पूर्णपणे विस्कळीत झाल्याने व्हॅनवाले काका थेट शेतशिवारात मजूरीसह हातगाडीवर भाजीपाला विक्री करत आहेत़
शहरी भागात नर्सरी, पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये जाणारे किमान ७० टक्के विद्यार्थी हे छोटीमोठी रिक्षा किंवा चारचाकी व्हॅनने शाळेत जातात़ विद्यार्थी संख्या वाढत गेल्याने आपसूकच या वाहनांच्या संख्येतही वाढ झाली आहे़ वेळ भरपूर द्यावा लागत असला तरी चांगला रोजगार मिळत असल्याने अनेकांनी कर्ज काढून तीनचाकी किंवा चारचाकी वाहने घेत विद्यार्थी वाहतूक सुरू केली आहे़ यातून एकट्या नंदुरबार शहरात २५० पेक्षा अधिक चालक आणि मालक आहेत़ २२ मार्च पासून लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर शाळा बंद पडल्याने विद्यार्थी वाहतूकीचा उपक्रमही बंद आहे़ आज ना उद्या शाळा सुरू होईल या भरवशावर दिवस काढणाºया या चालक मालकांचे पैश्यांअभावी हाल होत असल्याने त्यांनी किरकोळ व्यवसाय करुन उदरनिर्वाह सुरू केला आहे़ यात खाद्यपदार्थ, भाजीपाला, चहाटपरी यासह शेतात मजूरी करण्याचे काम हे रिक्षाचालक व मालक करत आहेत़ यातून घरखर्च भागवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले़ यातही लॉकडाऊन सुरू करण्यात आल्याने सुरू असलेल्या रोजगारात खंड पडला आहे़ यामुळे दरदिवशी होणारा व्यवसायही थांबला असल्याचे सांगण्यात आले आहे़
येत्या काळात सर्व प्राथ्मिक आणि माध्यमिक शाळा सुरू होवून पुन्हा जुने दिवस येणार अशी अपेक्षा असली तरी गेल्या चार महिन्यात थकलेले वाहनाचे हप्ते, दुरूस्त्यांचा खर्च आणि घराचा खर्च करण्यासाठी काढावे लागलेले कर्ज याची परतफेड करताना धावपळ उडत आहे़
कर्जाच्या हप्त्यांमुळे झाले बेजार
नंदुरबार शहरात किमान २५० रिक्षा-चालक आणि मालक आहेत़ विद्यार्थी वाहतूक हाच हा एकमेव व्यवसाय असल्याने मार्च ते मे दरम्यान हाती असलेल्या पैश्यात त्यांनी घरखर्च भागवला होता़ शासनाने कर्जाचे हप्ते घेण्यास मुदतवाढ दिली असल्याने त्यांना दिलासा मिळाला असला तरी येत्या काळात कर्जाचे हप्ते सुरू झाल्यास काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे़ शहरातील विविध भागात राहणाºया अनेकांनी रिक्षातून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू करुन कुटूंबाचा गाडा सुरू ठेवला आहे़ नंदुरबार सोबतच ग्रामीण भागातून विद्यार्थी वाहतूक करणाºया चालक आणि मालकांचीही गंभीर स्थिती आहे़ यातील बरेच जण शेतात कामाला जावून वेळ निभावून नेत आहेत़ शाळा सुरू झाल्यानंतर तात्काळ विद्यार्थ्यांकडून फी मिळणे अशक्य असल्याने शासनाने आणखी दोन महिने कर्जाचे हप्ते परतफेड करण्यासाठी मुदत द्यावी अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे़
विद्यार्थी वाहतूक बंद असल्याने भाडोत्री पद्धतीने चारचाकी वाहन चालवत आहे़ कोरोना नियमावलीनुसार ग्राहकाकडून कागदपत्रे दिल्यावरच गावी जायला मिळते़ यातून आठवड्यातून एखाद-दुसरी फेरी होत आहे़ विद्यार्थी वाहतूक करणारी रिक्षाही धूळखात पडून आहे़ शाळा सुरू झाल्यावर मुलांची शैक्षणिक फि कशी भरावी अशी चिंता आहे़ त्यात कुटूंबातील छोटी-मोठी कार्ये यामुळे चिंता वाढल्या आहेत़
-मंगलदास बेडसे, रिक्षामालक,
नंदुरबाऱ