वाढत्या तापमानामुळे नंदुरबारातील जनजीवनावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:16 PM2018-03-28T12:16:18+5:302018-03-28T12:16:18+5:30
असह्य ऊन व उकाडय़ाने हैराण
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 28 : यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वोच्च तापमानाची नोंद मंगळवार, 27 मार्च रोजी करण्यात आली. मंगळवारचे कमाल तापमान 40.2 तर किमान 21.3 सेल्सीयस नोंदले गेले. वाढत्या तापमानामुळे जनजिवनावर परिणाम झाला आहे. मंगळवारी बाजाराचा दिवस असूनही बाजारात दुपारी फारशी गर्दी दिसून आली नाही.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून तापमानाचा पारा वाढतच आहे. गेल्या दोन दिवसात दीड ते दोन सेल्सीयस तापमानाची वाढ झाली आहे. सरासरी तापमाना 38 ते 39 अंशार्पयत कायम होते. मंगळवारी मात्र तापमान थेट 40 च्यावर गेले. दुपारी दोन वाजता तापमानाची नोंद 40.2 इतकी नोंदली गेली. यंदाच्या उन्हाळ्यातील ही सर्वोच्च नोंद असल्याचे प्रशासनाचे म्हणने आहे. प्रशासनासह जिल्ह्यातील दोन्ही कृषी महाविद्यालय आणि कृषी विज्ञान केंद्रात देखील तापमानाचा आकडा 40 नोंदला गेला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात शासकीय तापमानाची आकडेवारी आपत्ती निवारण केंद्रातर्फे घेतली जाते. याशिवाय नंदुरबारातील हवामानाचे उपकरण थेट उपग्रहाने पुणे वेधशाळेशी देखील जोडले गेले आहेत. त्यांच्या आकडेवारीत देखील 40 हा आकडा नोंदला गेला आहे.
जनजिवनावर परिणाम
वाढत्या तापमानामुळे जनजिवनावर देखील परिणाम होत आहे. विविध आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ताप, डोकेदुखी, अंगदुखी या आजारांच्या रुग्णांमध्ये गेल्या चार ते पाच दिवसांपासून वाढ झाली असल्याचे जिल्हा रुग्णालय आणि खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी स्पष्ट केले. त्यामुळे उन्हापासून बचावासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
उष्माघात कक्षाची संकल्पना कालबाह्य
जिल्हा रुग्णालयांमधील उष्माघात कक्षांची संकल्पना कालबाह्य झाली आहे. जिल्हा रुग्णालयातील जवळपास सर्वच महत्वाचे वॉर्ड हे वातानुकुलीत करण्यात आलेले आहेत. त्यामुळे वेगळ्या अशा कक्षाची गरज नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आर.डी.भोये यांनी स्पष्ट केले. असे असले तरी उपजिल्हा रुग्णालये, ग्रामिण रुग्णालये या ठिकाणी असे कक्ष सज्ज ठेवण्याच्या सुचना याआधीच देण्यात आलेल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, वाढत्या तापमानामुळे गारवा देणा:या पदार्थाना देखील मागणी वाढली आहे. रसदार फळांना मोठी मागणी आहे.