नंदुरबारात अफवांमुळे पोलिसांची होतेय दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:49 PM2018-06-17T12:49:51+5:302018-06-17T12:49:51+5:30
बालकांच्या अपहरणांचे कथित प्रकार : अनेकजण खाताहेत विनाकारण मार
नंदुरबार : लहान मुले पळवून नेण्याच्या चर्चेने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या तीन ते चार दिवसात विविध ठिकाणांहून व संशयावरून पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आले. 15 दिवसांपूर्वी रेल्वे स्थानकावरील प्रकारामुळे भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, अशा प्रकारची कुठलीही टोळी जिल्ह्यात सक्रिय नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
राज्यात लहान मुलांना पळवून नेण्याच्या काही घटना घडल्या आहेत. याशिवाय सोशल मीडियावर जुन्या घटनांना नवीन रंग देऊन त्या प्रसारित करण्याचा प्रकारदेखील सुरू आहे. यामुळे मुले पळवून नेणारी टोळी जिल्ह्यात सक्रिय असल्याच्या अफवांना पेव फुटले आहे. सोशल मीडियावर दररोज याबाबत कुठली ना कुठली पोस्ट व्हायरल होत असते. परिणामी शहरात, वसाहतींमध्ये नवीन किंवा अनोळखी व्यक्ती दिसल्यास त्याच्याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
काहींना तर विनाकारण पब्लिक मारही खावा लागला आहे. गेल्या पाच दिवसात विविध ठिकाणांहून नागरिकांनी पाच जणांना पोलिसांच्या हवालीदेखील केले आहे. चौकशीत मात्र, काहीच तथ्य आढळून आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
रेल्वेस्थानकावरील घटना
15 दिवसांपूर्वी रेल्वे स्थानकावरील घटनेमुळे अशा प्रकारच्या अफवा आणि चर्चाना ऊत आला आहे. सिंधी कॉलनीतील एक कुटुंब नातेवाइकांना रेल्वेस्थानकावर सोडण्यासाठी आले असता परराज्यातील एका मानसिक रुग्णाने तीन वर्षाच्या बालकाला उचलून नेत पळ काढण्याचा प्रय} केला होता. नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याचा प्रय} अपयशी ठरला.
पोलिसांनी संबंधिताला अटक करून त्याची चौकशी केली असता तो मानसिक रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले. असे असले तरी वेळीच नागरिकांनी त्याला पकडल्याने पुढील अनर्थ टळला. बालकाशी त्याने काही अप्रिय केले असते तर काय झाले असते याचा विचार करूनच कुटुंबीयांना धडकी भरते.
चार जण संशयावरून ताब्यात
दोन दिवसांपूर्वी धानोरा रस्त्यावरील गजबजलेल्या भागातील वस्तीत फिरणा:या चार संशयितांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यात काहीही तथ्य आढळले नव्हते. त्यामुळे त्यांना चौकशी करून सोडून देण्यात आले होते.
त्यानंतर दुस:याच दिवशी बसस्थानक परिसरातदेखील तसाच प्रकार घडला.
शुक्रवारी सायंकाळी सिंधी कॉलनी परिसरात एका व्यक्तीने तीन वर्षाच्या बालकाला त्याच्या सायकलीवरून बसवून नेण्याचा प्रय} केला. त्यालाही नागरिकांनी ताब्यात घेत मार दिला व पोलिसांच्या हवाली केले. तो देखील मानसिक रुग्णच निघाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. त्याच्याविरुद्ध कुणीही फिर्याद न दिल्याने गुन्हा दाखल होऊ शकला नाही. त्याच्या नातेवाइकांना समज देऊन त्यालाही सोडून देण्यात आले.
बालकांच्या सुरक्षिततेचे काय?
अपहरण करणारी टोळी नसेल किंवा अशा घटनांमध्ये संबंधितांकडून अपहरणाचा उद्देश नसेल. परंतु अशा मानसिक रुग्णांकडून बालकाला काही अपाय केला गेला तर त्याला जबाबदार कोण? हा प्रश्न पुढे येतो.
असे मानसिक रुग्ण बालकांना उचलून नेण्यार्पयतची मजल मारतात तर त्यांना इजा पोहचविण्याबाबत देखील ते मागे-पुढे पाहणार नाहीत. त्यामुळे पोलिसांनी अशा बाबी सहजतेने न घेता गांभीर्याने घेणेदेखील आवश्यक आहे.