निराश्रित मातेला आधार देत जपली ममतेची रीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 11:28 AM2019-03-08T11:28:25+5:302019-03-08T11:28:31+5:30
यांचाही महिला दिन : पाणीपुरी विक्रेत्या महिलेची अशीही माणुसकी
भूषण रामराजे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी ‘ये ना सोचो इस में अपनी हार है की जीत आहे़़।
उसे अपनालोे जो भी जीवन की रीत है, ये जिद छोडो, यू ना तोडो, हर पल इक दर्पण हैै । या ओळी लिहिल्या होत्या़ जीवनाचा सारासार अर्थ सांगणाऱ्या या ओळींची प्रचिती नंदुरबारातील पाणीपुरी विक्रेत्या प्रमिला गुप्ता यांना पाहून येते़
चाळीशी पार केलेल्या प्रमिलाबाई रामचंद्र गुप्ता ह्या नंदुरबार शहरातीलच रहिवासी़ प्रारंभी रेल्वे कॉलनी परिसरात राहणाºया प्रमिला ह्या विवाहपश्चात पतीसोबत वर्धा येथे राहत होत्या़ परंतू पतीने घराबाहेर काढल्यानंतर त्या पुन्हा नंदुरबार येथे माहेरी आल्या़ माहेरी राहत असताना छोट्या-मोठ्या कामांसह मजुरी करुन मुलगी आणि स्वत:चा उदरनिर्वाह केला़ हे सर्व सुरु असतानाच आईचे अकाली निधन होऊन मग दिशा आणि दशाच बदलली़ कौटूंबिक वाद झाल्याने त्यांना वडीलांच्या घराबाहेर पडावे लागले़ आपल्यामुळे मुलीची परवड नको म्हणून तिला अनाथ आश्रमात दाखल करत केले़ दोन वर्षे रेल्वे रनिंग रुममध्ये स्वयंपाकी म्हणून काम करत दिवस काढले़ परंतू यातून भागत नसल्याने मग नंदुरबार शहरातील संजय टाऊन हॉल परिसरात पाणी पुरी विक्रीचा व्यवसाय सुरु केला़ प्रामुख्याने पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या व्यवसायात शिरकाव करुन स्वत:चे काही अंशी का होईना स्थान निर्माण करण्यात त्यांना यश आले़
हे सर्व सुरळीत सुरु असताना मात्र एके दिवशी सायंकाळी एक निराधार महिला रस्त्यावर सामान घेत भटकत असल्याचे त्यांना दिसून आले़ अन्नपाण्यावाचून व्याकूळ झालेल्या या महिलेची पार्श्वभूमी जाणून घेत अन्न आणि पाणी देत थोड्या वेळासाठी जागाही करुन दिली़ परंतू पुढे काय असा प्रश्न होताच़ परंतू कधीही मागे न हटणाºया प्रमिलाबाईंनी त्या मातेला आईचा दर्जा देत घरी आणले़ गेल्या वर्षभरापासून दोघीही गवळीवाड्यात छोटीशी खोली भाड्याने घेत राहत आहेत़ अनोळखी असल्या तरी ममत्त्व ह्या धाग्याने दोघीही एकमेकींशी बांधल्या जाऊन आता त्या एकमेकींचा आधार झाल्या आहेत़ यातून दोघींच्या बºयाच समस्या दूर झाल्याची भावना त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करत आहे़
दोघींच्या ह्या संघर्षपूर्ण अशा आयुष्याला साजेशा अशाच ओळी आनंद बक्षी साहेबांनी लिहिल्या असाव्यात़़ उसे अपनालोे जो भी जीवन की रीत है।़