साडेतीन एकरातील केळी पिकाची वाढ खुंटल्यामुळे फिरविला नांगर

By मनोज शेलार | Published: May 26, 2024 07:23 PM2024-05-26T19:23:37+5:302024-05-26T19:36:15+5:30

वाण्याविहीर गावालगत मोठ्या प्रमाणावर बागायत शेती केली जाते.

Due to stunted growth of banana crop in three and a half acres, the plow was turned | साडेतीन एकरातील केळी पिकाची वाढ खुंटल्यामुळे फिरविला नांगर

साडेतीन एकरातील केळी पिकाची वाढ खुंटल्यामुळे फिरविला नांगर

नंदुरबार : अवकाळी, गारपिटीसह विविध अस्मानी-सुलतानी संकटांचा सामना करत केळीचे पीक वाढविले, त्यावर लाखोंचा खर्च केला तो भरघोस उत्पन्न मिळणार या आशेने, परंतु गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानाच्या पाऱ्याने केळी उत्पादक शेतकऱ्याच्या आशा पुरत्या मावळतीला आल्या. काही केल्या केळीची वाढच होत नसल्याने हतबल झालेल्या अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर येथील कन्हैयालाल परदेशी या शेतकऱ्याने तब्बल साडेतीन एकरातील केळी पिकावर नांगर फिरविला आहे.

वाण्याविहीर गावालगत मोठ्या प्रमाणावर बागायत शेती केली जाते. मात्र, दिवसेंदिवस तापमानात होत असलेल्या कमालीच्या वाढीमुळे केळी या बागायती पिकांना भरपूर पाण्याची गरज असल्याने पुरेसे पाणी देऊनही पिकांची वाढ खुंटते व पिके जळू लागली आहेत. तसेच, योग्य प्रकारे उत्पन्न निघत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. 

मे महिन्यात साधारणतः रोजचे तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. परिसरात जमिनीचा पोत अतिशय उत्तम व काळी कसदार गाळाची जमीन असूनदेखील वाढत्या तापमानाचा फटका या नगदी पिकांना बसू लागला आहे. लाखो रुपये खर्च करून शेतकरी उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, निसर्ग साथ देत नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे.

वाण्याविहीर येथील कन्हैयालाल परदेशी यांनी गावालगत असलेल्या साडेतीन एकरातील केळी पिकाची वाढ वाढत्या तापमानामुळे होत नसल्यामुळे चार महिन्यांच्या केळी बागेवर नांगर फिरविला, तसेच नवीन पीक घेण्यासाठी शेत तयार करून घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. याच शेतकऱ्याची तीन ते चार एकर केळीची बाग तेरा महिन्यांची झाली असून, वाढलेल्या तापमानामुळे केळी योग्य प्रकारे तयार झाली नसल्याने मातीमोल भावात विकली जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. 

Web Title: Due to stunted growth of banana crop in three and a half acres, the plow was turned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.