अवकाळी पावसामुळे बळीराजा पुन्हा अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:26 AM2021-01-09T04:26:14+5:302021-01-09T04:26:14+5:30
आधीच खरीप पिकाला अतिवृष्टीचा फटका बसल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीतून उभे रहात नाही तोच रब्बीदेखील ...
आधीच खरीप पिकाला अतिवृष्टीचा फटका बसल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीतून उभे रहात नाही तोच रब्बीदेखील पावसाचे पाणी फिरल्याने शेतकऱ्यांचा अडचणीत वाढ होताना दिसत आहे. धडगाव परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने उमराणी बुद्रुक गावातील रमेश जेरमा पावरा या शेतकऱ्याच्या पिकांसह परिसरातील गहू, हरभरा, मका आदी पिके आडवी झाली आहेत. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासह तालुक्यातील हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले असून, भरपाई मिळावी म्हणून शेतकरी सरकारकडे आशेने बघत आहे.
धडगाव तालुका परिसरात आंबा, चारोळीचे चांगले उत्पन्न मिळत असल्याने सध्या या झाडांन मोहर यायला सुरुवात झाली आहे. मात्र अवकाळी पावसाचा या झाडांपासून मिळणाऱ्या उत्पन्नावरदेखील परिणाम करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील काही दिवस ढगाळ वातावरण व पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षी अवकाळी पावसामुळे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.