उभादगड येथील जलकुंभ ठरतोय निरुपयोगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 01:27 PM2018-04-21T13:27:08+5:302018-04-21T13:27:08+5:30
प्रशासनाचे दुर्लक्ष : शाळेच्या कुंपणाचीही दुरवस्था
लोकमत ऑनलाईन
कोंढावळ, दि़ 21 : शहादा तालुक्यातील उभादगड येथे पाच वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या जलकुंभात एक थेंबही पाणी टाकण्यात न आल्याने तो निरुपयोगी ठरत आहे. जि.प. शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली. या गावातील समस्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
उभादगड येथे स्वतंत्र ग्रामपंचायत नाही. 50 ते 60 झोपडय़ावजा घरे असलेले हे गाव असून पाच वर्षापूर्वी येथे जलकुंभ बांधण्यात आला आहे. मात्र अद्यापर्पयत या जलकुंभात पाण्याचा एक थेंबही टाकण्यात आलेला नाही. पाण्यासाठी एक किलोमीटर अंतरावर विहीर खोदण्यात आली आहे. गावात जलवाहिनीचे कामही अर्धवट झाले असून काही ठिकाणी पाईप जमिनीबाहेर आले आहेत. या अर्धवट जलवाहिनीला दोन-तीन ठिकाणी नळ काढून ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जातो. गावात पूर्ण जलवाहिनी टाकून विहिरीचे पाणी जलकुंभात टाकून पुरेसा पाणीपुरवठा करण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. तसेच उभादगड येथील जि.प. शाळेच्या कुंपणाची व वर्गखोलीची दुरवस्था झाली आहे. त्याचीही दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.