साडेनऊ लाखाच्या गुटख्यासह डंपर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 12:36 PM2020-04-17T12:36:00+5:302020-04-17T12:36:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गुजरातमधून नंदुरबारात येणारा नऊ लाख 67 हजारांच्या गुटख्यासह 25 लाखांचा डंपर एलसीबीच्या पथकाने मध्यरात्री ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गुजरातमधून नंदुरबारात येणारा नऊ लाख 67 हजारांच्या गुटख्यासह 25 लाखांचा डंपर एलसीबीच्या पथकाने मध्यरात्री नंदुरबारात जप्त केला. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकेश काशिनाथ नाईक, मनिष गणेश ठाकरे, नरेश विनोद पाडवी व राहुल भिका पाडवी सर्व रा.नळवा, ता.नंदुरबार अशी संशयीतांची नावे आहेत. डंपर मालक नरेंद्रसिंग राजपूत यांचा तपास सुरू आहे.
गुजरातमधून नंदुरबारात गुटख्याचा साठा येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरिक्षक किशोर नवले यांना मिळाली होती. पथकाने 15 रोजी रात्री 11 वाजेपासून निझर रस्त्यावर सापळा लावला होता. 16 रोजी उत्तररात्री दीड वाजता निझरहून भरधाव वेगात एक डंपर येतांना दिसला. पथकाने डंपरला थांबविण्याचा इशारा केला, परंतु भरधाव डंपर पुढे गेला. पाठलाग करून डंपरला थांबविले. डंपरमधील चालकासह तिघांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संशय बळावल्याने पथकाने डंपरमधील सामानाची तपासणी केली असता त्यात गुटख्याचा साठा आढळून आला.
सात लाख 53 हजार 600 रुपये किंमतीचा विमल पानमसालाचे 30 पोते, एक लाख 88 हजार 400 रुपये किंमतीच तंबाखूचे सहा पोते, 25 हजार रुपयांच्या इतर वस्तू आढळून आल्या. पोलिसांनी मुद्देमालासह 25 लाखांचा डंपरही जप्त केला.
ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांची चौकशी केली असता त्यांनी डंपर नरेंद्रसिंह राजपूत यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले. निझर येथून होलाराम सिंधी यांच्या गोडावूनमधून गुटखा भरून नंदुरबारात आणण्यास सांगण्यात आले होते. कुठे उतरावयाचा याबाबत नंदुरबारात पोहचल्यावर सांगण्यात येणार होते. शिवाय स्वत: राजपूत हा डंपरच्या पुढे कारने चालत असल्याचे सांगितले.
पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांसह नरेंद्रसिंह राजपूत, होलाराम सिंधी यांच्याविरुद्ध नंदुरबार उपनगर पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, उपनिरिक्षक योगेश राऊत, हवालदार प्रदिपसिंह राजपूत, दिपक मोरे, युवराज चव्हाण, अविनाश चव्हाण, पुरुषोत्तम सोनार, शोएब शेख यांनी केली.