शेणा-मातीच्या धूप दिव्यांचा मंत्रालयात दरवळ, आदिवासी महिलांना मिळाले मेहनतीचे फळ
By भूषण.विजय.रामराजे | Published: November 11, 2023 06:10 AM2023-11-11T06:10:37+5:302023-11-11T06:10:44+5:30
आदिवासी विकास विभाग आणि महिला आर्थिक विकास मंडळाच्या प्रयत्नाने वाण्याविहीर येथील बचत गटांच्या ४४ महिला सदस्यांनी शेणा-मातीपासून दिवे तयार करण्याचा हा अभिनव व्यवसाय सुरू केला आहे.
नंदुरबार : नंदुरबारच्या महिलांनी तयार केलेल्या धूप, दिवे आणि पणत्यांनी मुंबई मंत्रालयातील अधिकाऱ्यांनाही भुरळ घातली आहे. मंत्रालयात नुकत्याच झालेल्या नवतेजस्विनी दिवाळी मेळावा प्रदर्शनात शेणा-मातीपासून तयार केलेले दिवे, पणत्या हाताेहात विक्री झाल्याने जिल्ह्यातील आदिवासी महिलांना रोजगाराचा नवा मार्ग सापडला आहे. गेल्या काही काळात लाख रुपयांपर्यंतची उलाढाल करण्यात आली आहे.
आदिवासी विकास विभाग आणि महिला आर्थिक विकास मंडळाच्या प्रयत्नाने वाण्याविहीर येथील बचत गटांच्या ४४ महिला सदस्यांनी शेणा-मातीपासून दिवे तयार करण्याचा हा अभिनव व्यवसाय सुरू केला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाकडून शेणापासून दिवे व इतर साहित्य तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले होते. बचत गटाच्या गेंदुबाई वळवी आणि ज्योती गेंबू वळवी यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम सुरू झाला होता.
पशुसंवर्धन व दुग्धोत्पादन
याबाबत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक कांतागाैरी बनकर यांनी सांगितले की, आदिवासी महिलांना मिळालेला हा मार्ग जिल्ह्यातून होणारे स्थलांतर रोखू शकतो.हा प्रयोग इतरही गटांमध्ये राबवण्यात येणार आहे. यातून पशुधन संवर्धन आणि दुग्धोत्पादन असे दुहेरी यश मिळणार आहे.
देशभर वितरणाची तयारी
महिला आर्थिक विकास महामंडळाकडे बंगळुरू येथील एका कंपनीने प्रगती बचत गटाच्या महिलांना प्रशिक्षण देण्याचे निश्चित केले आहे. यानुसार, त्यांना पॅकेजिंग आणि लेबलिंगचे प्रशिक्षण देऊन वितरणही ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहेत.