गावाची तहान भागविण्यासाठी ‘त्यांनी’ काढले व्याजाने पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 01:08 PM2018-04-26T13:08:08+5:302018-04-26T13:08:08+5:30
टंचाईग्रस्त उमर्देखुर्द गावातील कथा : गरज भासल्यास उदरनिर्वाहासाठी असलेला टेम्पो विकण्याचीही तयारी
रमाकांत पाटील ।
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 26 : माणूस श्रीमंत असो वा गरिब पण गावाबद्दल ऋण फेडण्याची जेंव्हा जिद्द मनात पेटते तेंव्हा तो काहीही करू शकतो. याचे उदाहरण उमर्दे खुर्द ता.नंदुरबार येथील देता येईल. या गावातील पाच तरुणांनी गावाची तहान भागविण्यासाठी चक्क व्याजाने पैसे घेवून तलाव खोलीकरणाची कामे सुरू केली आहे. उर्वरित मदत लोकवर्गणीतून न मिळाल्यास रोजगारासाठी असलेला टेम्पो व रिक्षाही विकण्याची तयारी या युवकांनी दर्शविली आहे.
नंदुरबार शहरापासून जेमतेम पाच किलोमिटर अंतरावर उमर्दे खुर्द हे सुमारे अडीच हजार लोकवस्तीचे गाव. या गावाला पाण्याचा जणू शापच मिळाला आहे. गावात पिण्यासाठी पाणी नसल्याने ग्रामस्थांना रोज चार, पाच किलोमिटर भटकंती करून पाणी आणावे लागते. या गावासाठी शासनाने वासदरा धरणातून यापूर्वी योजना दिली होती. मात्र ती योजना बंद पडल्याने गेल्या काही वर्षापासून गावापासून तीन किलोमिटर अंतरावर असलेल्या वडगाव येथील विहिरीतून पाणी पुरवठा सुरू केला. परंतु ती विहिरही कोरडी झाल्याने गावात गेल्या तीन वर्षापासून तीव्र पाणी टंचाई आहे. या गावाला पावसाळ्यातील तीन महिने पाण्यासाठी आराम असतो. पण उर्वरित नऊ महिने रोज कुठे ना कुठे पाण्याचा शोध घेण्यासाठी फिरावे लागते. सध्या गावात 50 ते 100 रुपयात बैलगाडीवर पाण्याचे पिंप भरून आणून देण्याचा व्यवसायही सुरू आहे.
या गावाची वॉटर कप स्पर्धेसाठी निवड झाली असून गावातील कमलेश मधुकर चौधरी, मल्हारी खंडू पाटील, आनंदराव राजाराम मराठे, नंदु शिवदास कोतकर आणि अजय भिका ठाकरे या पाच तरुणांनी पाणी फाऊंडेशनचे प्रशिक्षण घेतले. या पाच जणांपैकी दोन जण रिक्षा व टेम्पो चालवून उदरनिर्वाह करतात. तर उर्वरित तिघे भुमीहिन व अल्पभूधारक शेतकरी आहेत. प्रशिक्षणाला गेल्यानंतर तेथे जे मार्गदर्शन मिळाले त्यातून या तरुणांना गावासाठी काहीतरी करण्याची जिद्द निर्माण झाली. विशेषत: पाण्यासंदर्भातील विषय असल्याने व गावात भिषण पाणीटंचाई असल्याने गावाची तहाण भागविण्यासाठी श्रमदानाबरोबरच वाटेल ते करण्याची त्यांची जिद्द पेटली. गावात आल्यानंतर तांत्रिक सल्लागाराचा सल्ला घेतला. त्यानुसार गावाचा उतार उलटय़ा दिशेने असल्याने या ठिकाणी सीसीटी अथवा इतर कामे जी श्रमदानातून करणे शक्य आहे ती जास्त कामे नव्हती. त्यामुळे गावातील तिन्ही तलावांचा गाळ काढण्याचा त्यांनी निर्णय घेतला. गावालगतच हे तलाव असून 1972 च्या दुष्काळात ते तयार करण्यात आले होते. या तलावाचे खोलीकरण करण्यासाठी भारतीय जैन संघटनेकडून जेसीबी विनामुल्य मिळाले पण त्यासाठी लागणारे डिङोल खरेदीसाठी मात्र पैशांची आवश्यकता होती. त्याकरीता त्यांनी गावात मदत फेरी काढली. पण त्यातही जेमतेम सात हजार रुपये जमा झाले. एका दानशुर व्यक्तीने दहा हजार दिले. या पैशातून डिङोलचा खर्च भागविणे शक्य नसल्याने आणि कामही होणे आवश्यक असल्याने या पाचही तरुणांनी स्वत:चा जिम्मेदारीवर एक लाख रुपये व्याजाने घेतले आहेत. त्या रक्कमतेतून तलावाचे खोलीकरणाचे काम सुरू आहे. गावातील एका तलावातील साधारणत: 44 हजार घनमिटर काम पुर्ण झाले आहे. तर दुस:या तलावाचे जवळपास एक लाख घनमिटरचे काम असून ते सुरू आहे. या कामांसाठी जवळपास 200 तास पेक्षा अधीक काळ जेसीबी मशीन वापरावे लागणार आहे. त्यासाठी जवळपास दोन लाख 20 हजार ते अडीच लाख रुपये खर्च अपेक्षीत आहे. गावात मदतीसाठी हे तरुण ग्रामस्थांकडे जात आहेत परंतु अपेक्षीत प्रतिसाद मिळत नाही. काही महिलांनी मदत दिली पण ती रक्कमही कमी आहे. त्यामुळे पुढील काम कसे करावे हा प्रश्न या तरुणांसमोर आहे. त्यासाठी मल्हार पाटील व कमलेश चौधरी यांनी आपल्याकडे असलेला टेम्पो आणि रिक्षा विक्री करण्याचा विचार सुरू केला आहे. एकुणच गावातील या तलावांचे खोलीकरण झाल्यास यंदाच्या पावसाळ्यात त्यात पाणी साठेल व गावाचा पाणी प्रश्न कायमचा सुटेल असा विश्वास या तरुणांना आहे. याशिवाय वॉटर कप स्पर्धेतही गावाला बक्षिस मिळविण्याची जिद्द व त्यासोबतच गावातील पाणी प्रश्न सोडविण्याची तळमळ त्यांची आहे. त्यांच्या या जिद्दीला आता लोकांचे पाठबळ मिळण्याची गरज आहे.