शहादा तालुक्यातील अनेक भागात भुकंपाच्या धक्क्यांमुळे एकच खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 12:35 PM2021-01-03T12:35:27+5:302021-01-03T12:35:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात शनिवार, २ जानेवारी दुपारी १.२४ मिनिटांनी ३.२ रिश्टर स्केल व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात शनिवार, २ जानेवारी दुपारी १.२४ मिनिटांनी ३.२ रिश्टर स्केल व १:२६ वाजताच्या सुमारास २.६ रिश्टर स्केल तीव्रतेचे दोन भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. शहरासह तालुक्यात कुठेही जीवित वा वित्तहानी झालेली नसल्याची माहिती तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.
शनिवारी दुपारच्या सुमारास शहरातील सोनार गल्ली भागात अचानक मोठा आवाज झाल्याने व्यावसायिकांसह परिसरातील नागरिक घरातून बाहेर रस्त्यावर आले होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमावर्ती भागातील गोगापूर जयनगर वडाळी भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. तालुक्यातील सावळदा येथील भूकंपमापन केंद्रात भूकंपाची नोंद झाली असून सुमारे ३.२ व २.६ रिश्टर स्केलचा धक्का असल्याची नोंद झाली आहे आहे शहरापासून सुमारे २४ किलोमीटर दूर असलेल्या मध्य प्रदेशातील पानसेमल तालुका हे भूकंपाचे केंद्र असल्याची माहिती सावळदा येथील भूकंपमापन केंद्राने दिली आहे.
या धक्क्यामुळे कुठे नुकसान झाले नसले तरी दिवसभर प्रशासनाला ग्रामीण भागातील नागरिकांचे फोन येत होते.
भूकंपाचे धक्के जाणवताच शहरात व ग्रामीण भागात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक नागरिक आपले घर परिसर सोडून मोकळ्या जागेत आले होते. दिवसभर सोशल मीडियावरही भूकंपाबाबत माहिती दिली जात होती व विचारणा केली जात होती.
भूकंपाचे धक्के जाणवले याची माहिती मिळताच प्रशासन सतर्क झाले होते. प्रशासनाने सर्व मंडळ अधिकाऱ्यांना सूचना देऊन आपापल्या परिसरातील परिस्थितीची माहिती जाणून घेतल्यानंतर तालुक्यात कुठलीही मोठी वित्त व जीवित हानी झालेले नाही. मात्र काही ठिकाणे रस्त्यांना तडे पडल्याची माहिती मिळत आहे.
वर्षभरापूर्वी...
n गेल्यावर्षीही जानेवारी महिन्यात पहिल्या आठवड्यात शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. त्यावेळेस ४.२ रिश्टर स्केलचा हा धक्का असल्याची नोंद सावळदा येथील भूकंप मापन केंद्रावर झाली होती. आता पुन्हा या वर्षी नूतन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भूकंपाचे धक्के जाणवल्याने हा योगायोग की भविष्यातील दुर्घटनेबाबत पूर्वसूचना यावरही जाणकारांमध्ये चर्चा सुरू होती.
परिसरात पाहणी करून आलो. स्थानिक यंत्रणेला सतर्क रहाण्याच्या सूचना दिल्या आहेत. लोकांनी घाबरून जाऊ नये. अफवा पसरवू नये वा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे काही जाणवल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा.
-डॉ. मिलिंद कुलकर्णी, तहसीलदार, शहादा.