नंदुरबारात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:14 AM2019-03-12T11:14:17+5:302019-03-12T11:14:45+5:30

निवडणूक : कायदा व सुव्यवस्थेलाही प्राधान्य, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची माहिती

Effective implementation of Code of Conduct in Nandurbar | नंदुरबारात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी

नंदुरबारात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी

Next

नंदुरबार : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी पथकांची व विशेष कक्षाचीही स्थापना करण्यात अलाी आहे. निवडणुका शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी मंजुळे यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार उपस्थित होते. निवडणुकीची तयारी, आचारसंहितेची अंमलबजावणी, संवेदनशील मतदान केंद्र यासह विविध बाबीसंदर्भात माहिती देतांना जिल्हाधिकारी मंजुळे यांनी सांगितले, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कालपासून लागू झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर, कटआऊट्स काढण्यासाठी ४८ तासांची मुदत देण्यात आली आहे. शासकीय वाहने, शस्त्रे जमा करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. शिवाय अपर जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली आचारसंहिता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक मतदारसंघात भरारी पथक, व्हीडीओ चित्रीकरण पथक, सांख्यिकी पथक नेमण्यात आले आहेत. निवडणुकीत सीव्हीजील अ‍ॅप वापरण्यात येणार असून याद्वारे आचारसंहिता भंगाची तक्रार नागरिकांना करता येणार आहे.
निवडणुकीसाठी मतदान यंत्रे देखील पुरेषा प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यात १,९२४ कंट्रोल युनिट, ३,२१९ बॅलेट युनिट, २,०४० व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध आहेत. सर्वच मतदान केंद्रात व्हीव्हीपॅट मशीनद्वारेच मतदान घेतले जाणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात एकुण १,३८० मतदान केंद्र असून धुळे जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदार संघात ३६५ तर शिरपूर मतदार संघात ३२३ मतदान केंद्र असे एकुण २,०६८ मतदान केंद्र राहणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी दिली. पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी सांगितले, जिल्ह्यात सहा ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. फरारी आणि पाहिजे असलेल्या आरोपींचाही शोध सुरू आहे. १२ जणांचे तडीपारचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. २६० पैकी ११ जणांना नॉन बेलेबल वॉरंट बजावण्यात आले आहे. परवानाधारक शस्त्रे बाळगणाऱ्यांकडून शस्त्रे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यापैकी २३ शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. दहा वर्षांपासून फरार असलेल्या आरोपींची माहिती दिल्यास संबधीताला दहा हजार रुपये रोख बक्षीस देखील देण्यात येणार असल्याची माहितीही पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी दिली.
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारसंख्या पुढील प्रमाणे : अक्कलकुवा : २,७२,८७२, शहादा : ३,१३,५४६, नंदुरबार : ३,३२,२६१, नवापूर : २,८३,६४७, साक्री : ३,३५,४३९ तर शिरपूर मतदारसंघात ३,१२,५७७ मतदार आहेत. एकुण १८,५०,४४२ मतदारांपैकी पुरुष मतदार ९,३४,२०७ तर महिला मतदार ९,१६,२१३ व २२ इतर मतदार आहेत.

Web Title: Effective implementation of Code of Conduct in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.