शेतकरी कर्जमुक्तीची प्रभावी अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 12:03 PM2020-01-28T12:03:43+5:302020-01-28T12:03:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना सातत्याने नुकसान सहन करावे लागले असताना त्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने महात्मा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना सातत्याने नुकसान सहन करावे लागले असताना त्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना सुरु केली आहे. तर गरीब व गरजू जनतेला अल्पदरात भोजन उपलब्ध करून देण्यासाठी शिवभोजन योजना सुरू केली आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड.के.सी.पाडवी यांनी केले.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७० वा वर्धापन दिनानिमित्त नवीन पोलीस कवायत मैदानात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अॅड.सीमा वळवी, खासदार डॉ.हिना गावीत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अॅड.राम रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सहाय्यक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अपर जिल्हाधिकारी दत्तात्रय बोरूडे, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, सुधीर खांदे आदी उपस्थित होते.
अॅड.पाडवी म्हणाले की, कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत अल्पमुदत पीक कर्ज व अल्पमुदत पीक कर्जाच्या पुनर्गठीत कर्जाची ३० सप्टेंबर २०१९ रोजी असलेली थकबाकी व परतफेड केलेली रक्कम दोन लाखापेक्षा कमी असल्यास अशा सर्व खात्यास दोन लाख मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. रक्कम दोन लाखापेक्षा अधिक असल्यास अशा शेतकऱ्यांना योग्य योजनेद्वारे दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पीक कर्जाची नियमित परतफेड करणाºया शेतकºयांना प्रोत्साहन देण्यासाठी लवकरच नवीन योजना जाहीर करण्यात येईल.
जिल्ह्यात दोन ठिकाणी शिवभोजन योजना सुरू करण्यात येत असून, केवळ १० रुपयात भोजन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्वावर दररोज ५०० थाळी भोजन वितरीत करण्यात येणार आहे. प्रत्येक थाळीमागे शासनातर्फे ३५ रुपये अनुदान देण्यात येईल. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना व नागरिकांना दिलासा देण्यासाठी दोन कोटी ९४ लाख रूपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी सुसज्ज ग्रंथालय इमारत उभारण्यात येत आहे. आदिवासी क्रीडा अकादमीची स्थापनादेखील करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १०३३ शाळा डिजीटल करण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
जिल्ह्यात रस्तेविकासाच्या कामांना गती देण्यात आली असून, विविध शासकीय कार्यालयांसाठी सुसज्ज इमारती उभारण्यात येत आहेत. रोजगार निर्मिती आणि घरकूल उभारणीतही जिल्ह्याने चांगली कामगिरी केली आहे, असेही ते म्हणाले. नंदुरबारच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही देताना महाविकास आघाडीचे सरकार सामान्य माणसाच्या समृद्धीसाठी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला वंदन
यावेळी पोलीस उपनिरिक्षक सिताराम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजास वंदन करण्यात आले. संचलनात महिला व पुरूष पोलीस, गृहरक्षक दल, एनसीसी, स्काऊट-गाईड, के.डी. गावीत सैनिकी स्कूल, कमला नेहरु कन्या विद्यालय, हरितसेना आणि पोलीस बॅण्ड पथकाने सहभाग घेतला. संचलनात जिल्हा पोलिसांची क्षमता दर्शविणारे तसेच सामाजिक संदेश देणारे चित्ररथ सहभागी झाले. यात बॉम्ब शोधक पथक, फॉरेन्सिक लॅब वाहन, दंगल नियंत्रण वज्र वाहन, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा चित्ररथ, ३३ कोटी वृक्ष लागवड, कर्जमुक्ती योजना, महाराजस्व अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ आदींचा सहभाग होता.
उल्लेखनिय काम करणाºयांचा सन्मान
पालकमंत्री अॅड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणारे अधिकारी, कर्मचारी, स्काऊट-गाईडचे विद्यार्थिनींना सन्मानित करण्यात आले. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांना स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. खडतर कामगिरी बद्दल विशेष सेवा पदक जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, पोलीस निरिक्षक संदीप रणदिवे, सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश न्हायदे व पोलीस उप निरिक्षक भुषण बैसाणे यांना प्रदान करण्यात आले. हातोडा फेकीत सुवर्ण पदक मिळविणारे भुषण चित्ते, ज्युदो कलस्टरमध्ये कांस्य पदक विजेत्या निंबाबाई वाघमारे यांनादेखील विशेष सेवा पदक प्रदान करण्यात आले.
माझी कन्या भाग्यश्री योजनेतंर्गत मुदतठेव प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी विभागातील उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या कृषी उपसंचालक मोहन रामोळे, कृषी पर्यवेक्षक उमेश भदाणे, कृषी सहाय्यक प्रमोद पाटील, शिलदार पावरा, पंकज बोरसे, रमेश शिरसाठ, विजय भलकारे, रायमल पावरा, तंत्रसल्लागार लक्ष्मीकांत बडगुजर यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा संस्था यांच्यामार्फत राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेल्या एकलव्य विद्यालयातील अनुराग चौधरी, भावेश मोरे, राहूल चौधरी तर डॉ.काणे गर्ल्स हायस्कूलच्या प्राजल अहिरे, दिव्या सोनार, कल्याणी जाधव यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. या वेळी माजी सैनिक, वीर पत्नी यांचाही सन्मान करण्यात आला.
ध्वजारोहणानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे देशाच्या कला व संस्कृतीचे सुंदर दर्शन घडले. हि.गो. श्रॉफ हायस्कूल यांच्यामार्फत जागर संविधानाचा हे पथनाट्य तर एस.ए. मिशन हायस्कूल, डॉ.काणे गर्ल्स हायस्कूल, अॅग्लो उर्दु हायस्कूल यांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले. के.आर. पब्लिक स्कूल यांनी एरियल सिल्क प्रात्यक्षिक सादर केले. या प्रात्यक्षिकाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शासकीय आश्रमशाळा भालेर यांनी देशभक्तीपर लेझिम नृत्य सादर केले. सूत्रसंचालन प्रा.माधव कदम यांनी केले.