सामूहिक विवाह सोहळ्यात आठ जोडपी विवाहबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:35 PM2019-03-11T12:35:47+5:302019-03-11T12:36:00+5:30
मराठा समाज : प्रकाशा येथे विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव
तळोदा : मराठा समाजाचा सहावा सामूहिक विवाह सोहळा रविवारी प्रकाशा, ता.शहादा येथे झाला. या सोहळ्यात आठ जोडपींचे शुभमंगल लावण्यात आले. या विवाह सोहळ्याला वºहाडींबरोबरच सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती.
प्रारंभी पुलवामा घटनेत शहीद झालेल्या दहशतवाद्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. क्षत्रिय मराठा समाज परिवर्तन चळवळ, मराठा समाज प्रबोधन मंडळ व मराठा युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने समाजाचा सहावा सामूहिक विवाह सोहळा प्रकाशा येथील अन्नपूर्णा माता मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. या वेळी समाजातील आठ जोडपींचे समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे पुरोहितांच्या मंत्रोच्चाराने शुभमंगल लावण्यात आले. तत्पूर्वी आठही वरांची घोड्यावरून वाजत-गाजत वरात काढण्यात आली. या वेळी खासदार डॉ.हीना गावीत, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार सुधीर तांबे, आमदार उदेसिंग पाडवी, आमदार अॅड.के.सी. पाडवी, माजी मंत्री अॅड.पद्माकर वळवी, सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, मराठा आरक्षण समितीचे समन्वयक संतोषराव मराठे, श्याम जाधव, भटू वाघारे, लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे, शहाद्याचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, तळोद्याचे नगराध्यक्ष अजय परदेशी, जि.प.चे उपाध्यक्ष सुहास नाईक, माजी उपनगराध्यक्षा शोभा मोरे, धुळे जिल्हा शिवसेना नेते अतुल सोनवणे, बोईसर येथील पत्रकार विठोबा मराठे, उद्योजक अनंत चौथे, राजेश जाधव, अरुण चौधरी, नगरसेवक गौरव वाणी, भास्कर मराठे, योगेश चौधरी, संदीप परदेशी, संदीप मराठे, अभिजित पाटील आदी उपस्थित होते.
या वेळी आमदार तांबे म्हणाले की, अशा प्रकारच्या सामूहिक विवाहातून समाजाचेही परिवर्तन होते व महागाईच्या जमान्यात ती काळाची गरज ठरली आहे. त्यामुळे सर्वच समाजाने सामूहिक विवाह सोहळ्याची कास धरण्याचे आवाहन त्यांनी केले. आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार अॅड.के.सी. पाडवी यांनीही मनोगत व्यक्त केले. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.
१० जणांचा गौरव
या विवाह सोहळ्यात परिवर्तन चळवळीतर्फे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या १० जणांचा सपत्नीक समाजविभूषण व समाजभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्यात आनंदराव वाल्मिक चौथे, राजेंद्रकुमार कृष्णराव गावीत, भटू काशीनाथ वाघारे, राजेश भास्करराव जाधव, कैलासराव विश्राम मराठे, विष्णू भिकन बाळदे, संजय प्रेमचंद जाधव, भास्करराव भिवसन कदमबांडे, विश्वासराव उखाजी मराठे, रामचंद्र दशरथ पाटील, डॉ.शिरीष निंबाजी शिंदे, शेख युनूस शेख बागवान, नवनीत विठ्ठल शिंदे, डॉ.एन.डी. नांद्रे, अशोकराव दौलतराव थोरात यांचा समावेश होता. आदर्श कुटुंब म्हणून सेलंबा येथील ईश्वर पवार यांना गौरविण्यात आले तर मराठा समाज उद्योजक विकास मंडळ जळगाव व धुळे-नंदुरबार मराठा समाज सार्वजनिक उन्नती मंडळालाही गौरविण्यात आले.
परिवर्तन चळवळीच्या कार्याचा अहवाल विठ्ठल मराठे यांनी मांडला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन भटू मराठे, नंदराव कोते व विकास पाटील यांनी केले. कार्यक्रमास अनेक दात्यांनी आर्थिक व वस्तूस्वरुपात मदत केली. सोहळ्यास वधू-वरांकडील वºहाडींसोबत जिल्हा व जिल्ह्याबाहेरील समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. त्यामुळे केदारेश्वर मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. विवाह सोहळ्यासाठी प्रा.डॉ.रवींद्र कदम, गिरधर पवार, शरदराव चव्हाण, विजय कदम, वामनराव चव्हाण, शिरीष जगदाळे, रवींद्र साळुंखे, युवराज मराठे, देवाजी बोराणे, धनराज पाचोरे, युवराज मुदगल, मनोज शिंदे, मनोज सरोदे, अर्जुन खांडवे, सुनील पवार, रमेश कुटे, रतिलाल साळुंखे, निलेश चव्हाण, कमलेश चव्हाण, हेमंत कदम, गणेश काळे, गोपाल गायकवाड, ईश्वर खयडे, कृष्णा पेखळे, गणेश बागडे, प्रफुल पोटे यांच्यासह विविध गावातील समाज बांधवांनी परिश्रम घेतले.