एकजुटीनं पेटलं रान, तुफान आलंया..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:17 PM2018-05-23T12:17:17+5:302018-05-23T12:17:17+5:30

मध्यरात्री राबताहेत हजारो हात : श्रमदानाच्या ठिकाणीच ‘हॅपी बर्थ डे’ अन् ‘अॅनिव्हर्सरीही

Ekusutanam Pattala Rana, a storm came. | एकजुटीनं पेटलं रान, तुफान आलंया..

एकजुटीनं पेटलं रान, तुफान आलंया..

googlenewsNext

रमाकांत पाटील । 
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि़ 23 : ‘गाव करी ते राव काय करी..’ ही म्हण गेल्या वर्षानुवर्षापासून समाजाला गाव ऐक्याचा संदेश देत आह़े  त्याचा प्रत्यय सध्या जलयुक्त शिवार अभियान आणि वॉटरकप स्पर्धेच्यानिमित्ताने गावागावात पहायला मिळत आहे. एरवी पक्ष, राजकारण आणि गटातटात विभागलेले गाव सध्या सर्व विसरून एकत्र येऊन पाण्यासाठी श्रमदानाला लागले आहे. विशेष म्हणजे रात्रीच्यावेळी मोबाईल आणि बॅटरीच्या प्रकाशात मध्यरात्रीर्पयत रानावनातच गाव श्रमदानाचा आनंदोत्सव साजरा करीत असल्याने खरोखरच ‘तुफान आलं या..’गत स्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात पाणीटंचाईची स्थिती अतिशय बिकट नसली तरी अनेक गावांमध्ये मात्र परिस्थिती गंभीर होऊ लागली आहे. त्याची जाण आता लोकांनाही होऊ लागली असल्याने पाण्यासाठी गावे जागृत झाली आहेत. गेल्या दोन वर्षापासून जलयुक्त शिवाराचे काम सुरू असले तरी या उपक्रमाला लोकचळवळीचे स्वरुप देण्याचे प्रयत्न जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी हे करीत आहेत. त्यांनी काही संस्था व सामाजिक कार्यकत्र्याना यासाठी प्रेरित केले असून गेल्या वर्षभरापासून अनेक गावात लोकसहभागातून जलसंधारणाच्या कामाला गती आली आहे. त्यातच यंदा वॉटरकप स्पर्धेत जिल्ह्याचा समावेश झाल्याने जिल्ह्यातील 85 गावांनी त्यात सहभाग घेतला आहे. सुरुवातीच्या काळात मात्र या गावांमध्ये फारसा उत्साह नव्हता. प्रशासनाचे अधिकारी, भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी आणि पाणी फाउंडेशनचे कार्यकत्र्यानी गावागावात जाऊन लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यातून हळूहळू लोकांची मानसिकता तयार होऊ लागली. अखिल भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा आणि पाणी फाउंडेशनचे प्रणेते अभिनेता आमिर खान व रणवीर कपूर यांनीही जिल्ह्यातील कामांच्या ठिकाणी हजेरी लावल्याने लोकांमध्ये चैतन्य आले आहे. त्यामुळे एरवी पक्षभेद, राजकारण, गट-तट, गरीब-श्रीमंत आणि वैयक्तिक अहंकाराने एकत्र न येणारे लोक आपला अहंमपणा विसरून आनंदाने हातात टिकाव-फावडी घेऊन पुढे येऊ लागले आहेत. विशेषत: सध्या उन्हाचा तडाखा असल्याने दिवसा फारसे काम होत नाही. त्यामुळे बहुतांश गावातील लोकांनी रात्रीचा ‘फाम्यरुला’ स्वीकारला आहे. सायंकाळी पाचपासून हळूहळू गावात जलसंधारणाची सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी लोक एकत्र येऊ लागतात आणि पाहता पाहता जसजशी सायंकाळ पुढे सरकत जाते तसतसे श्रमदानाच्या ठिकाणी उत्सवाचे स्वरुप येते. शाळकरी मुलांपासून तर तरुण-तरुणी आणि वयोवृद्धार्पयत लोक श्रमदान करण्यासाठी एकत्र येतात.
या पाश्र्वभूमीवर सोमवारी सायंकाळी काही गावांना भेटी दिल्या असता अगदी मध्यरात्रीर्पयत श्रमदानाची कामे सुरू असताना दिसून आली. शहादा तालुक्यातील कौठळ हे सुमारे दोन-अडीच हजार वस्तीचे गाव. याठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकंती करून पाणी आणावे लागते. पाण्याची पातळी खाली गेल्याने येथे पाण्याचे संकट आहे. या गावात पाणी फाउंडेशनचे काम सुरू आहे. सुरुवातीला जेमतेम प्रतिसाद असलेल्या गावात शेवटच्या टप्प्यात सारे गाव पूर्ण शक्तीनिशी गावातले पाणी गावातच अडविण्यासाठी एकत्र आले आहेत. त्यासाठी गावालगतच असलेल्या नाल्याचे पाणी अडविण्यासाठी भव्य तलाव खोदला आहे. भारतीय जैन संघटनेने जेसीबी व पोकलॅण्ड पुरवले असले तरी ग्रामस्थही स्वत: श्रमदान व आपल्याकडील यंत्रसामग्रीच्या साहाय्याने कामे करीत आहेत. याठिकाणी रात्री साडेनऊ वाजता भेट दिली असता सुमारे 200 पेक्षा अधिक लोक कामाच्या ठिकाणी उपस्थित होते. नव्हे तर सारे गाव एकत्र येऊन केलेल्या कामाचे समाधानही त्यांच्या चेह:यावर दिसत होते. याठिकाणी सरपंच रामदास मोरे, माजी सरपंच संजय पूना पाटील, खरेदी-विक्री संघाचे संचालक विनोद चौधरी, उद्धव पाटील, हिरालाल पाटील, भगवान पाटील, अरविंद चौधरी, मोहन तुकाराम चौधरी, संजय चौधरी आदींनी केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
रात्री 11 च्या सुमारास बामखेडा त.त., ता.शहादा या गावाला भेट दिली असता तेथेही मोबाईल आणि बॅटरीच्या प्रकाशात जवळपास 500 पेक्षा अधिक लोक श्रमदान करीत होते. विशेष म्हणजे ज्या टेकडय़ांवर सीसीटी तसेच मातीबांधचे काम केले जात आहे ते ठिकाण गावापासून जवळपास चार किलोमीटर लांब असतानाही येथे लोक मोठय़ा संख्येने एकत्र येऊन काम करताना दिसले. त्यात सर्व वयोगटातील ग्रामस्थांचा सहभाग होता. महिलांमधील उत्साह मात्र वेगळाच दिसून आला. याठिकाणी महिला सरपंच असल्याने त्यांनी महिलांना प्रोत्साहीत केले आहे.
 

Web Title: Ekusutanam Pattala Rana, a storm came.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.