नंदुरबार तालुक्यात आठ ठिकाणी निवडणूक,धडगाव तालुक्यात प्रभाग बिनविरोध,तळोद्यात निवडणूक सात ग्रामपंचायती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 12:19 PM2021-01-05T12:19:33+5:302021-01-05T12:20:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील २२ ग्रामपंचाय निवडणूक कार्यक्रमांतर्गत माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत १४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून केवळ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील २२ ग्रामपंचाय निवडणूक कार्यक्रमांतर्गत माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत १४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून केवळ आठ ठिकाणी मतदान होणार आहे. गावागावातील ज्येष्ठांसह विद्यमान सदस्य व इच्छुकांमध्ये समझोता झाल्यानंतर झालेल्या निर्णयाअंती या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या ७० प्रभागातून ४७३ अर्ज मुदतीअंती दाखल झाले होते. यातील १४ अर्ज अवैध ठरल्याने ४५९ अर्ज वैध ठरले होते. या अर्जांकडे माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत लक्ष लागून होते. दरम्यान, सोमवारी माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत १४ ग्रामपंचायतींमधील १९४ अर्ज मागे घेतले गेले. यातून या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. बिनविराेध झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये खुर्दे खुर्द, बलदाणे, खोक्राळे, निंभेल, न्याहली, शनिमांडळ, तलवाडे खुर्द, तिलाली, आराळे, खोंडामळी, मांजरे, शिंदगव्हाण, विखरण आणि काकर्दे यांचा समावेश आहे. दरम्यान, ही गावे बिनविरोध झाल्यानंतर आता कंढरे, भादवड, कार्ली, वैंदाणे, भालेर, हाटमोहिदे, कोपर्ली व नगाव या गावांमधील २७ प्रभागांसाठी निवडणूक कार्यक्रम होणार आहे. दिवसभरात तब्बल ४३ प्रभागातून १९४ अर्ज मागे घेतले गेल्याने २२ पैकी १४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यानंतर आठ गावांमधील निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना चिन्ह वाटपाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. दरम्यान, माघारीसाठी मोठ्या संख्येने गावोगावचे पुढारी तहसील कार्यालयात दाखल झाल्याने याठिकाणी मोठी गर्दी उसळली होती. दरम्यान, अर्ज छाननीच्यावेळी तालुक्यातील सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले होते. उर्वरित सात ग्रामपंचायती या आजच्या दिवशी बिनविरोध झाल्याने एकच जल्लोष करण्यात आला. तालुक्यातील भालेर, कोपर्ली आणि हाटमोहिदा या मोठ्या ग्रामपंचायतींकडे लक्ष लागून राहणार आहे. चिन्ह वाटप होताच निवडणूक लढवणारे इच्छुक गावाकडे रवाना झाले होते. त्यांच्याकडून तयारीला सुरुवात करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवार व पॅनलप्रमुखांकडून तहसील कार्यालय आवारातच जल्लोष करण्यात येत होता.
नंदुरबार तालुक्यातील मतदान होणा-या आठ ग्रामपंचायतींपैकी भालेर व कोपर्ली या दोन ग्रामपंचायती सर्वाधिक लक्ष्यवेधी आहेत. या ठिकाणी प्रचाराच्या विविध क्लृप्त्या लढवल्या जात आहेत.
धडगाव तालुक्यात प्रभाग बिनविरोध
धडगाव तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींसाठी एकूण ४०९ अर्ज वैध ठरवण्यात आले होते. यातील ७६ अर्ज सोमवारी अंतिम मुदतीअंती माघारी घेण्यात आले होते. यातून ३३३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. धडगाव तालुक्यातील धनाजे व भोगवाडे या ग्रामपंचायतींमधील प्रत्येकी दोन प्रभाग बिनविरोध झाले आहेत. तालुक्यात निवडणूकीची रंगत वाढत असून सर्वच ठिकाणी मतदान होणार असल्याने उमेदवार सोमवारी सायंकाळपासून प्रचाराला लागल्याचे दिसून आले होते.
तळोद्यात निवडणूक
१३४ रिंगणात ; सात ग्रामपंचायती
तळोदा तालुक्यातील सात ग्रामपंचायतींसाठी सोमवारी माघारीच्या मुदतीत १७९ वैध अर्जांपैकी ४७ जणांनी माघार घेतली. यातून निवडणूक रिंगणात ४७ उमेदवार आहेत. तालुक्यात सर्वाधिक उमेदवार हे रेवानगर ग्रामपंचायतीसाठी निवडणूक लढवत आहेत.
तालुक्यात सर्वाधिक उमेदवार हे रेवानगर ग्रामपंचायतीसाठी निवडणूक लढवत आहेत. तालुक्यातील रेवानगर, नर्मदानगर, सरदार नगर, रोझवा पुनर्वसन, बंधारा, राणीपूर आणि पाडळपूर अशा सात ग्रामपंचायतींचा कार्यक्रम लागून करण्यात आला होता. सात ग्रामपंचायतीच्या ५१ जागांसाठी १८२ जणांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. यातील तीन बाद ठरले होते. तर १७९ अर्ज वैध ठरले होते. दरम्यान सोमवारी माघारीच्या अंतिम मुदतीत ४७ जणांनी अर्ज मागे घेतल्याने ५१ सदस्यपदांच्या जागांसाठी १३४ जण निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान सोमवारी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी तळोदा पंचायत समितीच्या आवारात उमेदवार व त्यांचे समर्थक उपस्थित होते. तालुक्यात एकही ग्रामपंचायत बिनविरोध झालेली नसल्याची माहिती आहे.