निवडणूक पुढे ढकलल्याने खर्च वाढला : तळोदा पालिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 12:20 IST2017-12-16T12:19:55+5:302017-12-16T12:20:01+5:30

निवडणूक पुढे ढकलल्याने खर्च वाढला : तळोदा पालिका
तळोदा : पालिका निवडणुकीची तारीख पुढे ढकलण्यात आल्याने उमेदवारांना प्रचार करण्यास चार दिवस जास्त मिळाले. त्यामुळे उमेदवारांचा खर्चही वाढला. निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याने आणखी चार दिवस प्रचार यंत्रणा खेचून नेण्याचे दिव्य सर्वच उमेदवारांना पार पाडावे लागत आहे.
निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, निवडणुकीसाठी नऊ प्रभागाकरीता शहरात 35 मतदान केंद्र ठेवण्यात आली आहेत. मतदान केंद्रावर 349 कर्मचा:यांची नियुक्ती करण्यात आली असून, निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे याची दक्षता घेण्यासाठी दोन आचार संहिता पथक कार्यरत आहेत. त्यांच्या सोबत दोन छायाचित्रण करण्यासाठी दोन व्हीडीओ ग्राफर देण्यात आले आहे. प्रत्येक कार्यक्रम, सभा, रॅली व निवडणूक कार्यक्रमाचे चित्रण करण्यात येत आहे.
मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व इतर निवडणूक कर्मचा:यांचे काम नियमानुसार व बिनचूक होण्याच्या दृष्टीने 28 नोव्हेंबर 2017 व 5 डिसेंबर 2017 रोजी दोन वेळा प्रशिक्षण देण्यात आले आहे. ए.व्ही.एम. मतदान यंत्र, बॅलेट युनीट, कंट्रोल युनीट आदी 13 डिसेंबर रोजी उमेदवार त्यांचे समर्थक यांच्या समोर सील करण्यात आले आहे. 16 डिसेंबर रोजी सर्व निवडणूक कर्मचा:यांना तिसरे प्रशिक्षण देवून मतदान साहित्य वाटप केले जाणार आहे. मतदान केंद्रावर मतदान साहित्य पोहोचविण्यासाठी पुरेशा प्रमाणात वाहन व्यवस्था करून वाहन अधिग्रहित करण्यात आली आहेत.
मतमोजणी 18 डिसेंबर रोजी सकाळपासून सुरू होणार असून, मतमोजणीची व्यवस्था मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत करण्यात आली आहे. त्यासाठी 30 टेबलांवर 30 कर्मचारी मतमोजणीचे काम करतील. पालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी, प्रांताधिकारी विनय गौडा, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार योगेश चंद्रे, पालिका मुख्याधिकारी जनार्दन पवार हे काम पाहात आहेत. पालिकेचे कर्मचारी विजय सोनवणे, राजेंद्र सैंदाणे, प्रशांत ठाकूर, दिलीप वसावे, अनिल माळी हे निवडणूक शाखेत काम पाहात आहेत.