गाव, पाड्यांचे विद्युतीकरण पुर्ण करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 11:14 AM2020-01-30T11:14:22+5:302020-01-30T11:14:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात विद्युतीकरणाचे बाकी असलेले गाव व पाडे तातडीने पुर्ण करावे तसेच सोलरचे कामे तातडीने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात विद्युतीकरणाचे बाकी असलेले गाव व पाडे तातडीने पुर्ण करावे तसेच सोलरचे कामे तातडीने पुर्ण करावे अशा सुचना खासदार डॉ.हिना गावीत यांनी जिल्हा विकास व समन्वय समितीच्या सभेत बोलतांना दिल्या.
जिल्हा विकास व समन्वय समितीची सभा बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. खासदार डॉ.हिना गावीत यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्षा अॅड.सिमा वळवी, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार शिरिष नाईक, जिल्हाधिकारी डॉ. राजेद्र भारुड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रकल्प अधिकारी वसुमना पंत, अविशांत पंडा, अशासकीय सदस्य डॉ.कांतीलाल टाटीया, डॉ.रविंद्र बैसाणे, बबीता नाईक, प्रदीप वळवी आदी उपस्थित होते.
यावेळी विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. खासदार डॉ.हिना गावीत यांनी सांगितले, जिल्ह्यातील दुर्गम भागात अनेक गाव व पाडे अद्यापही विद्युतीकरणापासून वंचीत आहेत. या ठिकाणी वीज पुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या कामांना वेग देण्यात यावा. ज्या ठिकाणी भौगोलिक अडचणी असतील अशा ठिकाणी सौर उर्जेचा पर्याय निवडावा. सौर उर्जेला प्राधान्य देण्यात यावे. नर्मदा काठावरील अनेक गावांमधील सौरउर्जेवरील स्ट्रीट लाईट बंद आहेत. जवळपास ६५० सौर लाईट बसविण्यासाठी प्रस्ताव आहेत. त्यापैकी एकही आलेला नाही. ते तातडीने उपलब्ध करून द्यावे अशा सुचना खासदार गावीत यांनी केल्या.
बीएसएनएलची यंत्रणा जिल्ह्ययात सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावा. दुर्गम भागात अधिकाधिक ठिकाणी मोबाईल टॉवर उभारावे. पुरहाणीतील रस्त्यांची दुरूस्तीला मंजुरी देण्यात आली आहे. निधी मंजुर करण्यात आला आहे. त्यात ११ रस्त्यांचा समावेश आहे. १३ कोटी रुपये त्यासाठी मंजुर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पाणी पुरवठा योजनेसंदर्भात आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी मुद्दा उपस्थित केला. यासाठी प्रत्येक तालुकानिहाय आढावा बैठक घेण्यासंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांना सुचीत केले.
ग्रामीण भागात केंद्र पुरस्कृत योजनांची माहिती देण्यासाठी ग्रामीण भागात शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.भारुड यांनी दिली.
यावेळी सदस्यांनी देखील विविध प्रश्न उपस्थित केले.
महामार्ग व ग्रामिण रस्ते दुरूस्तीला प्राधान्य देण्याच्या सुचना बैठकीत देण्यात आल्या. अती पावसामुळे अनेक भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात देखील होत आहेत. या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी स्थानिक स्तरावर प्रस्ताव सादर करावेत. याकरीता विविध माध्यमातून निधी उपलब्ध करून घ्यावा. महामार्ग दुरूस्तीसाठी राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. नवीन रस्त्यांनाही प्राधान्य दिले जात आहे.