भोंगरा येथील महिलांचा दारूबंदीसाठी एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:12 PM2019-06-04T12:12:07+5:302019-06-04T12:12:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील भोंगरा येथे मोठय़ा प्रमाणावर बिनधास्तपणे सुरू असलेली दारू विक्री बंद करून गावात दारूबंदी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील भोंगरा येथे मोठय़ा प्रमाणावर बिनधास्तपणे सुरू असलेली दारू विक्री बंद करून गावात दारूबंदी करावी या मागणीसाठी गावातील महिलांनी एकत्र येत शहादा येथे तहसीलदार मनोज खैरनार व पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांची भेट घेऊन दारूबंदी करण्यासंदर्भात निवेदन दिले.
शहादा शहरापासून 22 किलोमीटर अंतरावर मंदाणे गावाच्या पुढे दोन हजार 200 एवढी लोकसंख्या असलेल्या भोंगरा गावात मोठय़ा प्रमाणावर अवैधपणे गावठी दारू पाडून विक्री होत आहे. त्यासोबतच विविध प्रकारच्या विदेशी दारू गावात राजरोसपणे विक्री होत असल्यामुळे गावातील तरुण पिढी व्यसनाच्या व दारूच्या आहारी लागल्याने बरबाद होत आहे. दारूचे व्यसन लागल्याने तरुणांचे शिक्षण व कामधंदा याकडे लक्ष न लागता फक्त दारूच्या मागे ते लागले आहेत. भोंगरा गावात अवैधपणे दारू पाडून सुमारे 65 टक्के लोक दारूच्या व्यवसाय करीत आहेत. या गावठी दारूमुळे 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलेदेखील दारूच्या आहारी गेले आहेत. गावात दारूचे व्यसन असलेले तरुणांचा मृत्यू झाल्यान तरुण मुली विधवा झाल्या आहेत. गावात दारूबंदी करावी या आशयाचे निवेदन अनेकदा पोलीस व संबंधित प्रशासनाला देऊनही त्यांच्या वतीने गावात अवैध दारू विक्री करणा:यांवर काहीच कारवाई का होत नाही असा प्रश्न ग्रामस्थांना पडल्याने गावातील महिलांनी एकत्र येत शहादा गाठून पोलीस व तहसीलदारांसमोर दारूबंदी करण्यासंदर्भात आपले म्हणणे मांडले.
भोंगरा परिसरातील मंदाणे, वडगाव, चांदसैली, घोडलेपाडा, भुलाणे या गावांमध्ये कडक दारूबंदी करण्यात आली आहे. या गावांमध्ये दारू मिळत नसल्याने या गावांमधील लोक भोंगरा येथे दारू घेण्यासाठी येतात. यामुळे भोंगरा गावात मोठय़ा प्रमाणावर गावठी दारूचा व्यवसाय केला जात असून गावात अशांतता पसरते. घराघरांमध्ये व गल्लीबोळात नेहमी वादविवाद सुरू असतात. यात महिलांनादेखील मारहाण केली जाते. गावात दारूबंदीसाठी आवाज उठवणा:या लोकांचाही आवाज दाबला जातो. सोमवारी पोलिसांना दारूबंदीसाठी निवेदन देण्यासाठी येणा:या महिलांनाही धमकावून काढण्याचा प्रकार झाला. म्हणून या दारू विक्री करणा:यांना कायद्याचा व पोलिसांचा धाक तरी आहे का? हे यावरून दिसते.
संबंधित प्रशासन व पोलीस निरीक्षक यांना याआधी वारंवार निवेदन दिले आहे. सोमवारीही निवेदन दिले असून आता गावात कारवाई करून दारूबंदी न झाल्यास ग्रामस्थ व महिलांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करून येणा:या विधानसभा व जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकू, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर प्रमिलाबाई पानपाटील, अंजनाबाई पानपाटील, चंदनबाई पवार, बेबाबाई इंगळे, लताबाई पानपाटील, रंजनाबाई पानपाटील, संगीताबाई इंगळे, गंगाबाई पावरा, प्रमिला पावरा, सुमन पावरा, प्रमिला पावरा, बाईशी पावरा, नीलम पावरा, राब्याबाई पावरा, मदन पावरा, मनीषा पावरा हिरा वळवी, मनोज चव्हाण आदींच्या सह्या आहेत.