अडचणीच्या उमेदवारांच्या माघारीसाठी प्रयत्नांना जोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:33 AM2021-09-27T04:33:20+5:302021-09-27T04:33:20+5:30
नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या ११ गट आणि १४ गणांच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी चित्र स्पष्ट होणार आहे. माघारीची अंतिम मुदत असल्याने ...
नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या ११ गट आणि १४ गणांच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी चित्र स्पष्ट होणार आहे. माघारीची अंतिम मुदत असल्याने अडचणीच्या ठरणाऱ्या उमेदवारांना माघारीसाठी आज रात्रभर प्रयत्न सुरू राहणार आहेत. जि.प.गटांसाठी १३२, तर पं.स.गणांसाठी ८१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.
ओबीसी आरक्षणामुळे नंदुरबार जिल्हा परिषदअंतर्गत ११ गट, तर शहादा, नंदुरबार व अक्कलकुवा पंचायत समितीअंतर्गत एकूण १४ गणांच्या निवडणुका रद्द झाल्या आहेत. जुलै महिन्यात या रद्द झालेल्या गट व गणात निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या; परंतु लागलीच न्यायालयाच्या आदेशामुळे स्थगित करण्यात आल्या होत्या. २१ ऑक्टोबरपासून स्थगित निवडणुकांचा कार्यक्रम पुन्हा पुढे सुरू करण्यात आला असून २७ सप्टेंबर ही अर्ज माघारीची शेवटची मुदत आहे.
अनेक गट, गणात गर्दी
जिल्हा परिषदेच्या १४ गटांपैकी अनेक गटांमध्ये इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली आहे. त्यामुळे प्रमुख पक्षाच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. संबंधित उमेदवारांच्या माघारीसाठी हरतऱ्हेने प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता विविध माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सोमवारी नंदुरबार, शहादा तहसील कार्यालयात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
१३२ अर्ज
१४ जिल्हा परिषद गटांसाठी तब्बल १३२ अर्ज आलेले आहेत. सर्वाधिक अर्ज हे म्हसावद, पाडळदा, कोपर्ली, कोळदा, खापर, वडाळी या गटात आहेत. गणांची स्थिती देखील अशीच आहे. १४ गणांसाठी ८१ अर्ज दाखल आहेत. ज्या गट व गणांमध्ये प्रतिष्ठित उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत अशा गटांमध्ये इच्छुकांचा भरणा अधिक आहे. सर्वच जागा या सर्वसाधारण झाल्या असल्यामुळे सर्वच ठिकाणी ही गर्दी पहावयास मिळत आहे.
माघारीनंतर प्रचाराला जोर
उमेदवारी निश्चित असलेल्या प्रमुख उमेदवारांनी आठ दिवसांपूर्वीपासूनच आपल्या गट व गणांमध्ये प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी, कॅार्नर सभा घेण्यात येत आहेत. प्रचाराची पहिली फेरी या उमेदवारांनी पूर्ण केली आहे. २७ तारखेनंतर चित्र आणखी स्पष्ट होणार असल्याने प्रचाराला अधिक जोर येणार आहे. त्यादृष्टीने सर्वच उमेदवारांनी नियोजन केेले आहे.
प्रशासकीय तयारी
एकीकडे राजकीय पक्षांनी प्रचाराला जोर दिलेला असताना दुसरीकडे प्रशासकीय तयारी देखील जोरात सुरू आहे. मतदानासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना पहिले प्रशिक्षण दिले गेले आहे.
५ ऑक्टोबरला मतदान झाल्यानंतर सर्व मतपेट्या नंदुरबारात वखार महामंडळाच्या गोदामात, तर शहादा व अक्कलकुवा येथे तहसील कार्यालयात जमा करण्यात येतील. दुसऱ्या ठिकाणी त्याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी देखील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.