भाजी मार्केटमधील अतिक्रमण काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 12:54 PM2019-01-22T12:54:02+5:302019-01-22T12:54:06+5:30
पालिकेची कारवाई : तळोद्यात वाहतूक सुरळीत होण्यास मदत
तळोदा : शहरातील पालिकेच्या जागेवरील जुन्या भाजी मार्केटमधील 20 दुकानांचे अतिक्रमण पालिकेने जेसीबीच्या सहाय्याने काढली. यामुळे येथे सातत्याने होणारी वाहतुकीची कोंडी सुरळीत झाली आहे. याशिवाय पालिकेच्या व्यापारी गाळ्यांनीदेखील मोकळा श्वास घेतला आहे. पालिकेने ही अतिक्रमणे काढल्यामुळे शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.
पालिकेच्या मालकीच्या जागेवर गेल्या अनेक वर्षापासून दुकाने थाटून भाजी व धान्य मार्केट थाटण्यात आले होते. तथापि या ठिकाणी पालिकेने खताचे व्यापारी गाळे उभारले आहे. परंतु अजूनही या व्यापारी गाळ्याच्या पुढील भागात 20 दुकाने सुरूच होती.
येथील अतिक्रमणे हटविण्यासाठी संबंधीत दुकानदारांना पालिकेने नोटीसादेखील बजाविल्या होत्या. ही अतिक्रमणे हटविण्यासाठी पालिकेने शनिवारी मोहीम हाती घेतली. काही मालकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतली तर इतरांचे अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आली आहेत. जवळपास 20 दुकानांचे अतिक्रमण काढण्यात आल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले आहे. या ठिकाणी दुकानदारांनी मातीचे कच्चे ओटे बांधले होते. या अतिक्रमणामुळे येथील वाहतुकीची सतत कोंडी होत असे. त्यामुळे दोन वाहने एकमेकांजवळून निघताना मोठी कसरत करावी लागत होती. त्याचबरोबर पादचा:यांनादेखील येथून मार्गक्रमण करतांना जीव मुठीत घालून करावा लागत होता. आता पालिकेने अतिक्रमण हटविल्यामुळे व्यापारी गाळ्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. मात्र वाहतुकही सुरळीत होण्यास मदत झाली आहे.