थकबाकीदारांची मालमत्ता जप्ती मोहीम
By admin | Published: March 18, 2017 12:22 AM2017-03-18T00:22:23+5:302017-03-18T00:22:23+5:30
कर वसुली : नंदुरबार पालिका करणार कारवाई
नंदुरबार : पालिकेच्या कर वसुली मोहिमेअंतर्गत सोमवारपासून मोठ्या थकबाकीदारांवर थेट जप्तीची कारवाई सुरू करण्यात येणार आहे. जप्ती करण्यात आलेली मालमत्ता पालिकेच्या नावावर होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी गणेश गिरी यांनी दिली.
शासनाने सर्वच पालिकांना १०० टक्के कर वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. त्यापेक्षा कमी वसुली झाल्यास पालिकांना मिळणारी विविध अनुदाने बंद करण्याचे किंवा कमी करण्याचेदेखील पालिकेने ठरविले आहे. शिवाय अधिकारी व कर्मचाºयांवरही टांगती तलवार राहणार आहे. ही बाब लक्षात घेता नंदुरबार पालिकेने वसुलीची धडक मोहीम सुरू केली आहे. मोठ्या थकबाकीदारांची नावे त्यांच्याकडील थकीत रकमेसह वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यात येत आहेत. त्यानंतरची पुढची पायरी ही संबंधित मालमत्ताधारकांच्या मालमत्ता जप्त करण्याची राहणार आहे. त्यासाठी अशा थकीत मालमत्ताधारकांना आधी नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. आता जप्तीच्या नोटिसा बजावण्यास सुरुवात झाली आहे. दोन दिवसात नोटिसा बजावण्याची प्रक्रिया झाल्यानंतर सोमवारपासून थेट मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. ३० हजारांपेक्षा किंवा ५० हजारांपेक्षा जास्त थकबाकीदारांवर ही कारवाई सुरू करण्यात येणार आहे. जप्तीच्या कारवाईनंतर १५ दिवसानंतरही थकबाकी न भरल्यास त्या मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे. लिलावात कुणी खरेदी न केल्यास पालिका ती मालमत्ता आपल्या नावावर करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी गणेश गिरी यांनी दिली.