शहाद्यातील ग्लैंडर्सबाधित घोड्याला दयामरण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 09:01 PM2023-04-11T21:01:17+5:302023-04-11T21:02:41+5:30
घोड्याला झालेल्या रोगाच्या पार्श्वभूमीवर या परिसरातील पाच किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित घोषित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
नंदुरबार : जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील घोड्याला ग्लैंडर्स रोगाची लागण झाल्याने दयामरण देण्यात आले आहे. २८ मार्च रोजी घोड्याला ग्लैंडर्स रोगाचे निदान झाले होते. शहादा शहरातील घोड्याला झालेल्या रोगाच्या पार्श्वभूमीवर या परिसरातील पाच किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित घोषित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
बल्कोहोल्डिया मलाॅय या जिवाणूमुळे घोड्यांमध्ये ग्लैंडर्स रोगाची लागण हाेते. हा रोग झाल्यानंतर घोड्याच्या कातडीवर फोड येणे, ताप, अशक्तपणा, चारा-पाणी न खाणे अशी लक्षणे बळावतात. रोग संसर्गजन्य असल्याने त्याला दयामरण देण्याचा निर्णय घेण्यात येतो. शहादा शहरातील एकाने शिरपूर, जि. धुळे येथील यात्रोत्सवातून विकत आणलेल्या घोड्यात या प्रकारची लक्षणे दिसून आल्यानंतर पशुवैद्यकीय दवाखान्यात तपासणी करण्यात आली होती.
घोड्याच्या रक्ताचे नमुने हिसार (हरयाणा) येथील लॅबमध्ये घोड्याला जिवाणूमुळे ग्लैंडर्स रोगाची लागण झाल्याचा अहवाल आला होता. हा आजार माणसातही बळावण्याची शक्यता असल्याने दक्षता म्हणून शासकीय नियमानुसार घोड्याला दयामरण देण्यात आले. या भागात एकूण १६ घोडे आणि गाढव असून, त्यांचे नमुने संकलित करण्यात आले आहेत. सोबत घोडा मालकाची आरोग्य तपासणी करून रक्तनमुने घेण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे.